दिल्लीचे लोकायुक्तपद दोन वर्षांपासून रिक्त

By Admin | Updated: July 6, 2015 23:17 IST2015-07-06T23:17:05+5:302015-07-06T23:17:05+5:30

भ्रष्टाचाराविरुद्ध जनलोकपाल आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोव्हेंबर २०१३ पासून रिक्त असलेले लोकायुक्तांचे पद भरलेले नाही.

Delhi's Lokayukta has been vacant for two years | दिल्लीचे लोकायुक्तपद दोन वर्षांपासून रिक्त

दिल्लीचे लोकायुक्तपद दोन वर्षांपासून रिक्त

नवी दिल्ली : एकेकाळी भ्रष्टाचाराविरुद्ध जनलोकपाल आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोव्हेंबर २०१३ पासून रिक्त असलेले लोकायुक्तांचे पद भरलेले नाही, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रारही या पक्षाने केली.
दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी सार्वमत घेण्याची भाषा आपने चालविल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी जोरदार हल्लाबोल केला. आम आदमी पार्टीने सरकार सोडून द्यावे आम्ही त्यांना सध्याच्याच घटनात्मक चौकटीत प्रशासन कसे चालवायचे ते दाखवून देऊ, या शब्दांत त्यांनी केजरीवालांना आव्हानही दिले. केजरीवाल आमदारांची वेतनवाढ, सरकारच्या प्रचारासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविण्यासारख्या मुद्यांवर ते सार्वमत का घेत नाहीत? असा सवालही त्यांनी केला.
नोव्हेंबर २०१३ पासून लोकायुक्तांचे पद रिक्त आहे. दुर्दैवी बाब म्हणजे गेल्या पाच महिन्यांपासून दिल्लीत केजरीवालांचे सरकार आहे. जनलोकपालांबद्दल बोलणारा हा पक्ष सत्तेत असताना लोकायुक्त आणि लोकपाल कुठेच दिसत नाही, अशी घणाघाती टीका करीत काँग्रेसने आज दिल्लीत आंदोलनही केले.


विधानसभेचे दोन सत्र आटोपले आहे. लोकायुक्त कायदा आणण्याचे कोणतेच संकेत नाही. गेल्यावेळी आपने ४९ दिवस सरकार चालविले तेव्हा केजरीवालांना जनलोकपाल कायदा आणू दिला नाही म्हणून राजीनामा दिला होता. आता दीडशे दिवस उलटले आहेत. लोकपाल कुठे आहे? जुन्या लोकायुक्तांचेच पद भरलेले नाही, असे माकन यांनी स्पष्ट केले.(वृत्तसंस्था)
——————————————
रिकाम्या खुर्चीसमोर सांकेतिक अर्ज
दरम्यान, माकन यांनी लोकायुक्तांच्या रिक्त खुर्चीसमोर आम आदमीच्या पार्टीच्या आमदारांविरुद्ध सांकेतिक अर्ज दाखल करीत निषेध नोंदविला. आम्ही रिक्त खुर्चीसमोरच सांकेतिक अर्ज दाखल केला आहे. केजरीवालजी तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्तांबद्दल खूप बोलले आहेत, ते कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला. दिल्ली सरकारने जाहिरातींवर खर्चाची तरतूद २४ कोटी रुपयांवरून ५२६ कोटी रुपयांवर नेली आहे, त्यावेळी आणि आपच्या कार्यकर्त्यांना सरकारी नोकऱ्या देताना त्यांनी सार्वमत मागितले काय? केवळ भांडणे लावण्यासाठी त्यांना सार्वमत हवे आहे, असेही माकन म्हणाले.

Web Title: Delhi's Lokayukta has been vacant for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.