ओबामांसाठी बदलणार दिल्लीचे वातावरण
By Admin | Updated: January 19, 2015 11:05 IST2015-01-19T02:52:25+5:302015-01-19T11:05:56+5:30
दिल्लीचे प्रदूषण तूर्तास भारतासाठीच नाही तर अमेरिकेसाठीही डोकेदुखी बनले आहे़ दिल्लीच्या प्रदूषणाने अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची प्रकृती बिघडू शकते,

ओबामांसाठी बदलणार दिल्लीचे वातावरण
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
दिल्लीचे प्रदूषण तूर्तास भारतासाठीच नाही तर अमेरिकेसाठीही डोकेदुखी बनले आहे़ दिल्लीच्या प्रदूषणाने अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची प्रकृती बिघडू शकते, अशी चिंता ओबामांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना सतावत आहे़ विशेष म्हणजे याचमुळे ओबामांच्या दौऱ्यावेळी किमान तीन दिवस दिल्लीला प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत़ दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती याअनुषंगाने आखण्यात आलेल्या उपाययोजनांवर काम करीत आहे़
प्रदूषणाशी निपटण्याच्या मोहिमेत लोकांना सहभागी करून घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत़ यासाठी सोशल नेटवर्किं ग साईटचा आधार घेतला जात आहे़
ओबामा २५ ते २७ जानेवारीपर्यंत दिल्लीत असतील़ गत तीन वर्षांतील आकडेवारी बघता, या तारखांना दिल्लीच्या वातावरणात हानिकारक प्रदूषण पसरविणाऱ्या २़५ मायक्रोनपेक्षा लहान कणांची (आरपीएम) संख्या १३० ते २३४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर राहिली आहे़
याचा अर्थ दिल्लीच्या प्रदूषणाचा स्तर अमेरिकच्या मापदंडाच्या तुलनेत ८ पट, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मापदंडाच्या तुलनेत ५ पट आणि भारतीय मापदंडांच्या तुलनेत २ पट विषारी आहे़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा २६ जानेवारीला प्रति क्युबिक मीटर हवेत आरपीएमचा स्तर ९० ते ११० मायक्रोग्रॅम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान ओबामा सुमारे अडीच तास राजपथावर असतील़ सूत्रांच्या मते, दिल्लीतील प्रदूषणाच्या भीतीने या काळात ओबामा कमीत कमी हवेच्या संपर्कात यावेत, असा कार्यक्रम अमेरिकन अधिकाऱ्यांनी आखला आहे़ यादरम्यान लुटियन झोनमध्ये वाहनांची संख्या कमीत कमी असावी, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे़ रायसीला हिल्स भागात २३ जानेवारीपासूनच या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू होईल़
लुटियन झोनमधील सर्व शासकीय कार्यालयेही २४ जानेवारीपासून बंद राहतील़ याशिवाय जड वाहनांना रिंग रोडच्या बाहेर ठेवले जाईल़ एवढेच नव्हे तर दिल्लीत उघड्यावर स्वयंपाक करून प्रवाशांना जेऊ घालणारे ढाबेही या काळात बंद असतील़