गेल्या काही दिवसांत एसीच्या स्फोटामुळे दुर्घटना घडल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अगदी सोमवारी देखील एका एसी स्फोटामुळे संपूर्ण कुटुंबाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली होती. यांनतर आता दिल्लीतील एका पिझ्झा आउटलेटमध्ये एसीचा स्फोट झाला आहे. मंगळवारी दिल्लीतील यमुना विहारमधील एका फूड आउटलेटमध्ये एसीचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एसीचा कंप्रेसर फुटला आणि जोरदार आगीसह स्फोट झाला, असे सांगितले जात आहे.
या एसीच्या स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. रात्री उशिरा यमुना विहार परिसरात एका फूड आउटलेटच्या तळमजल्यावर बसवलेल्या एसी कॉम्प्रेसरमध्ये अचानक स्फोट झाला. अपघाताची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी सुमारे तीन अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवल्या. स्फोटात जखमी झालेल्या पाच जणांना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.
दिल्ली पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दिल्ली अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.