दिल्ली पोलीस विचारतात राहुल गांधी दिसतात कसे?
By Admin | Updated: March 14, 2015 17:03 IST2015-03-14T12:33:24+5:302015-03-14T17:03:28+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नक्की दिसतात कसे असा प्रश्न खुद्द दिल्ली पोलिसांनीच विचारल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलीस विचारतात राहुल गांधी दिसतात कसे?
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - काही दिवसांची रजा घेऊन अज्ञातवासात गेलेले राहुल गांधी नक्की दिसतात कसे असा प्रश्न खुद्द दिल्ली पोलिसांनीच विचारल्याने एकच खळबळ उडाली आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाचे उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी हे सर्वांना परिचित आहेत, मात्र ते कसे दिसतात याबाबत दिल्ली पोलिसांनी चौकशी केल्याचे वृत्त असून काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त केली आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस मुख्यालयाला भेट दिली आणि राहुल गांधी कसे दिसतात, त्यांच्या केसांचा आणि डोळ्यांचा रंग कसा आहे असे प्रश्न विचारत चौकशी केली. तसेच त्यांच्या शारीरिक ठेवणीचे वर्णनही करण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. या प्रकाराबद्दल काँग्रेस पक्षातून नाराजी व्यक्त करण्यात आली असून पक्षाने तीव्र आक्षेपही नोंदवला आहे.
राहुल गांधी हे खासदार असल्याने संसदेत त्यांच्याविषयी सर्व माहिती आहे, इंटरनेटवरही त्यांचे फोटो उपलब्ध आहेत. असे असतानाही पक्षाच्या मुख्यालयात जाऊन त्यांच्याबद्दल चौकशी करण्याची काय गरज होती, असा सवाल काँग्रेसने केला आहे. चौकशी करून त्यांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न म्हणजे हेरगिरी असल्याचा आरोपही काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी मात्र आपण राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात गेल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात आहेत. ते सध्या नक्की कुठे आहेत, याबाबत कोणालाच माहित नसून त्याबद्दल चर्चा सुरू असतानाचा पोलिसांनी केलेल्या या चौकशीमुळे आता नवीन चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.