दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामानामुळे ४० हून अधिक फ्लाइट्स डायव्हर्ट करण्यात आली आहेत तर सुमारे १०० फ्लाइट्स लेट आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) राजधानी दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन तासांत दिल्ली आणि आसपासच्या भागात ७०-८० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
दिल्लीतील जाफरपूर कलान परिसरात ४ जणांचा मृत्यू
दिल्लीतील जाफरपूर कलान परिसरात जोरदार वाऱ्यांमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. शेतात बांधलेल्या घरावर एक मोठं कडुलिंबाचं झाड कोसळलं, ज्यामुळे घरातील एक महिला आणि तीन मुलांचा ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच पोहोचलेल्या मदत आणि बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून सर्वांना बाहेर काढलं, परंतु रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यामध्ये एक जण जखमी झाला आहे, ज्यावर उपचार सुरू आहेत.
दिल्लीमध्ये रेड अलर्ट
पालम हवामान केंद्राने ७४ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची पुष्टी केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस उष्णतेपासून आराम मिळेल आणि कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिल्लीत वादळासाठी जारी केलेला रेड अलर्ट वाढवला आहे. यासोबतच, आयएमडीने लोकांना घरातच राहण्याचा आणि दरवाजे, खिडक्या बंद ठेवण्याचा, कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
अनेक फ्लाइट्सच्या उड्डाणांवर परिणाम
दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक फ्लाइट्सच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. याबाबत विमानतळ प्रशासनाने प्रवाशांसाठी एक विशेष सूचना जारी केली आहे. खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरील काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे, असं म्हटलं आहे. प्रवाशांना त्यांच्या फ्लाइट्स उड्डाणाच्या अपडेट्ससाठी त्यांच्या संबंधित कंपन्यांशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे.