दिल्लीत तरुणीची भररस्त्यात हत्या
By Admin | Updated: September 21, 2016 06:37 IST2016-09-21T06:37:23+5:302016-09-21T06:37:23+5:30
दिल्लीच्या बुराडी भागात माथेफिरू तरुणाने भरदिवसा चाकूचे वार करून तरुणीची हत्या केली.

दिल्लीत तरुणीची भररस्त्यात हत्या
नवी दिल्ली : दिल्लीच्या बुराडी भागात माथेफिरू तरुणाने भरदिवसा चाकूचे वार करून तरुणीची हत्या केली. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना मंगळवारी सकाळी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी एकतर्फी प्रेमातून गेल्या वर्षभरापासून पीडितेचा पाठलाग करीत होता.
या दुर्दैवी तरुणीची ओळख पटली असून, करुणा असे तिचे नाव आहे. २२ वर्षांची करुणा एका शाळेत शिक्षिका होती. दिल्लीचे (उत्तर विभाग) पोलीस उपायुक्त मधुर वर्मा यांनी सांगितले की, सुरिंदरसिंग या युवकाने बुराडी लेबर चौकाजवळ करुणावर चाकूचे सपासप वार केले. २० हून अधिक वार झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी वार करीत असताना एका व्यक्तीशिवाय कोणीही तिच्या मदतीला धावला नाही. एकाने त्या इसमाला अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला चाकूच्या भीतीने तो पळून गेला. (वृत्तसंस्था)