Delhi Assembly Elections 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी गुरुवारी (30 जानेवारी 2025) दिल्लीतील रोहिणी येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 'निवडणूक जिंकण्यासाठी खोटे बोलणे थांबवा, असे केजरीवालांना सांगण्यासाठी मी आलो आहे. दिल्लीतील जनतेला त्रास देण्यासाठी भाजपने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचे बिनबुडाचे आरोप केजरीवाल करतात,' अशी टीकाही शाहांनी केली.
अमित शाहा पुढे म्हणतात, 'केजरीवालजी, भाजपने विष मिसळल्याचा आरोप करता. कोणते विष मिसळले आहे? त्याचे नाव काय? कोणत्या प्रयोगशाळेने त्याची चाचणी केली आहे? हे तुम्ही सांगा. तुम्ही दुसरा आरोप करता की, आम्ही यमुनेचे पाणी रोखले. आम्ही हे पाणी रोखले असते, तर गावांमध्ये पूर आला असता. कोणत्या गावात पूर आला, हे तुम्हा सांगा. दिल्लीतील आप सरकारनेच यमुना प्रदूषित करून दिल्लीकरांना दूषित पाणी पिण्यास भाग पाडले आणि दिल्ली जल बोर्डात भ्रष्टाचार केला,' असा आरोपही शाहांनी केला.
दिल्लीत परिवर्तनाची लाटयावेळी शाहांनी आम आदमी पक्षावर (आप) भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आणि दिल्लीत भाजपच्या बाजूने परिवर्तनाची लाट असल्याचा दावा केला. अमित शाहा म्हणाले की, 'अरविंद केजरीवाल खोटे बोलण्यात आणि बहाण्यांमध्ये नंबर 1 आहेत. आप लबाडी आणि फसवणूक करणारा पक्ष आहे. केजरीवालांनी निवासी भागात दारुबंदी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र दारुची दुकाने उघडली. शाळा, मंदिरांसमोरही दारूची दुकाने उघडण्यात आली.'
'त्यांनी यमुनेला लंडनच्या थेम्स नदीप्रमाणे बनवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत त्यांनी स्वतः त्यात कधीच डुबकी मारली नाही. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने यमुनेवर विषप्रयोग केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. 2010-11 च्या अण्णांच्या आंदोलनावेळी केजरीवाल यांनी राजकीय पक्ष काढणार नसल्याचे सांगितले होते, मात्र अण्णा हजारे राळेगावातही पोहोचले नव्हते अन् त्यांनी 'आप'ची स्थापना केली. केजरीवालांना बंगला कमी पडला, त्यानंतर त्यांनी काचेचा महाल बांधला आणि त्यात सोन्याचे कमोड बसवले. आता दिल्लीत परिवर्तन नक्की होणार. भाजपची सत्ता आल्यावर दिल्लीला देशातील नंबर 1 राज्य बनवणार,' असे आश्वासन शाहांनी यावेळी दिले.