AAP List: दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आम आदमी पक्षाने सर्व उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. आपची चौथी आणि शेवटची यादी रविवारी (१५ डिसेंबर) जाहीर करण्यात आली. या यादीत मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाचाही समावेश आहे.
आम आदमी पक्षाने ३८ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. अखरेच्या यादीमध्ये मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री आतिशी यांना पुन्हा कालकाजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सौरभ भारद्वाज यांना ग्रेटर कैलास मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
कस्तुरबा नगर विधानसभा मतदारसंघातून आपने विद्यमान आमदार मदन लाल यांचे तिकीट कापले असून, त्यांच्याऐवजी रमेश पहेलवान यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
रमेश पहेलवान आणि त्यांची नगरसेवक पत्नी कुसुमलता यांनी रविवारी (१५ डिसेंबर) भाजपचा राजीनामा देऊन आपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रमेश पहेलवान यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
केजरीवाल म्हणाले, '७० जागांसाठी...'
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची अखेरची जाहीर जाहीर केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक पोस्ट केली.
"आज आम आदमी पक्षाने सर्व ७० जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पक्ष पूर्ण आत्मविश्वास आणि तयारीने निवडणूक लढवत आहे. भाजप गायब आहे. त्यांच्याजवळ ना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे, ना टीम आहे, ना नियोजन आहे, ना दिल्लीसाठी काही उद्दिष्ट", असे केजरीवाल म्हणाले.
"त्यांची (भाजप) केवळ एकच घोषणा आहे, एकच नीति आहे आणि फक्त एकच मिशन आहे, केजरीवालला हटवा. त्यांना (भाजप) विचारलं की, ५ वर्षात काय केलं, तर ते उत्तर देतात, केजरीवालला खूप शिव्या दिल्या", अशा शब्दात केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला.
"आमचा पक्षाकडे दिल्लीकरांच्या विकासासाठी एक उद्दिष्ट आहे. नियोजन आणि त्याची अमलबजावणी करण्यासाठी शिकलेल्या लोकांची एक चांगली टीम आहे. मागील दहा वर्षात केलेल्या कामांची मोठी यादी आहे. दिल्लीकर काम करणाऱ्यांना मत देतील, शिव्या देणाऱ्यांना नाही", अशी टीका केजरीवाल यांनी भाजपवर केली.
अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर मंत्री गोपाल राय हे बाबरपूर, जरनल सिंह तिलक नगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सत्येंद्र कुमार जैन हे शकूर वस्ती, अमानतुल्ला खान हे ओखला, मुकेश कुमार अहलावत सुलतानपूर माजरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.