Delhi Elections 2025 Yamuna Issue : नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी पक्षाचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. स्वाती मालीवाल सोमवारी पूर्वांचल समुदायाच्या महिलांसह दिल्लीतील यमुना घाटावर पोहोचल्या. यावेळी, यमुना नदीच्या दूषित पाण्याबाबत स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरले.
भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांनी यमुना नदीच्या अस्वच्छतेचा मुद्दा दिल्ली विधानसभा निवडणुकीत बनवला आहे. नमुना नदीच्या अस्वच्छतेसाठी भाजप नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरले आहे. अशातच आता स्वाती मालीवाल यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
"अरविंद केजरीवाल यांच्यामुळे यमुना नदीचे नाल्यात रुपांतर झाले आहे. मी पूर्वांचलच्या महिलांसोबत इथे आले आहे. यमुनेची अवस्था खूपच वाईट आहे आणि इतकी दुर्गंधी येत आहे की, इथे उभे राहणेही कठीण आहे", असे स्वाती मालीवाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. पुढे त्या म्हणाल्या की, "आम्ही अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊ आणि त्यांना विचारू की यमुना स्वच्छतेसाठी खर्च केलेले ७५०० कोटी रुपये कुठे गेले."
याचबरोबर, पूर्वांचलच्या महिलांना जाणून घ्यायचे आहे की, त्या छठ पूजा कुठे करणार? असा सवाल करत स्वाती मालीवाल म्हणाल्या की, यमुना नदी व्हेंटिलेटरवर आहे, पण अरविंद केजरीवाल खूप मोठे माणूस झाले आहेत, ते शीशमहालमध्ये राहतात. दरम्यान, स्वाती मालीवाल देखील महिलांसोबत अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचल्या आणि निदर्शने केली. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.