Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी करतार नगर मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. रॅलीसाठी पीएम मोदी जेव्हा मंचावर पोहोचले, तेव्हा पटपडगंज मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवींद्र सिंह नेगी यांनी त्यांच्या पायाला स्पर्श केला. यानंतर मोदींनीही नेगी यांच्या पायाला तीन वेळा स्पर्श केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोदींचा आप-काँग्रेसवर निशाणायावेळी पंतप्रधान मोदींनी आपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दिल्लीकर म्हणतात की, आता आपची खोटी आश्वासने चालणार नाहीत. आता दिल्लीतील जनतेला भाजपचे डबल इंजिन सरकार हवे आहे. दिल्लीला असे सरकार हवे आहे, जे गरिबांसाठी घरे बांधेल आणि प्रत्येक घरात पाणी देईल. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी(अरविंद केजरीवाल) हरियाणाच्या लोकांवर घृणास्पद आरोप केले आहेत.
त्यांचा निर्लज्जपणा बघा की, ते हरियाणातील जनतेवर यमुनेत विष मिसळल्याचा आरोप करतात. त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही. तुमच्या इकोसिस्टमने तुमचे पाप झाकण्याचा प्रयत्न केला, तरी दिल्ली विसरू शकत नाही. हरियाणातील प्रत्येक मूल हे कधीच विसरणार नाही. दिल्लीतील जनतेचा भाजपच्या संकल्पावर आणि मोदींच्या हमींवर पूर्ण विश्वास आहे. या जागेच्या विकासात मी कोणतीही कसर सोडणार नाही, याची ग्वाही देतो, असे मोदी यावेळी म्हणाले.
कोण आहेत रवींद्र सिंह नेगी?हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रवींद्र सिंह नेगी कोण आहेत? असा प्रश्न विचारला जातोय. तर, भाजपचे उमेदवार रवींद्र नेगींनी गेल्या निवडणुकीत पटपतगंज जागेवर आपचे दिग्गज नेते मनीष सिसोदिया, यांना कडवी टक्कर दिली होती. सिसोदिया यांचा गेल्या निवडणुकीत घासून विजय झाला होता. यंदाच्या निवडणुकीत आपने सिसोदियांची जागा बदलली असून, ते जंगपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर, शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांना पटपतगंजमधून तिकीट दिले आहे. अवध ओझांसमोर रवींद्र सिंह नेगींचे तगडे आव्हान असेल.
रवींद्र नेगी उत्तराखंडचे रहिवासी मूळचे उत्तराखंडचे असलेले रवींद्र सिंह नेगी सध्या दिल्ली महानगरपालिकेचे सदस्य आहेत. ते विनोद नगर वॉर्ड-198 चे नगरसेवक आहेत. विनोद नगर हा वॉर्ड पटपतगंज विधानसभा मतदारसंघांतर्गत येतो. रवींद्र नेगी हे पटपरगंज भागातील प्रसिद्ध नाव आहे. सिसोदिया यांना अशी निकराची लढत देऊन ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहेत. नेगी यांची आरएसएसमध्येही चांगली पकड असून त्यांनी या क्षेत्रात महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
नरेंद्र मोदींना कोणी पाया पडलेले आवडत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेते किंवा इतरांच्या पाया पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा मोदींनी आपल्यापेक्षा लहान वयाच्या लोकांच्या पाया पडताना तुम्ही पाहिले असेल. याचे कारण म्हणजे, मोदींनी कोणी आपल्या पाया पडलेले आवडत नाही. त्यामुळेच कोणीही त्यांच्या पायाला स्पर्श केला, तर ते लगेच समोरच्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करतात आणि त्या व्यक्तीला पाया न पडण्यास सांगतात.