दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये सत्ताधारी आप आणि विरोधी पक्षांमधील भाजपामध्ये चुरस दिसून येत आहे. दरम्यान, या मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी दिल्लीत आपचा विजय होऊन अरविंद केजरीवाल हे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
मतमोजणीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आतिशी म्हणाल्या की, दिल्लीतील जनता आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभी राहील आणि दिल्लीमध्ये पुन्हा अरविंद केजरीवाल हे प्रचंड बहुमतासह चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतील.
त्यांनी पुढे सांगितले की, ही कुठली सामान्य निवडणूक नव्हती तर चांगलं आणि वाईटामधील लढाई होती. काम आणि गुंडगिरीमधील लढाई होती. मात्र कालकाजी आणि दिल्लीतील लोक चांगलं आणि कामाच्या बाजूने उभे राहतील असा मला विश्वास आहे.
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ६० जागांचे कल हाती आले असून, त्यामध्ये भाजपाने ३६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर आपला २३ जागांवर आघाडी आहे. एका जागेवर काँग्रेस पुढे आहे.