Delhi Election 2025 : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आक्रमकपणे प्रचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज(दि.12) त्यांनी शकूरबस्ती झोपडपट्टीचा दौरा केला. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 'निवडणुका जसजशा जवळ येतात, तसतसे झोपडपट्टीवासीयांवर भाजपचे प्रेम वाढते. त्यांना झोपडपट्टीवासीयांवर प्रेम नाही, तर त्यांची मते आणि जमिनीवर प्रेम आहे.'
केजरीवालांनी यावेळी अमित शाहांना आव्हान दिले. ते म्हणाले की, मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, जर अमित शाहांनी पुढील 24 तासांत गेल्या 10 वर्षात झोपडपट्टीवासीयांवर दाखल झालेले सर्व खटले मागे घ्यावेत. काल शाहांनी झोपडपट्टीवासीयांना बोलावून मला शिवीगाळ केली होती. गृहमंत्र्यांनी एका मर्यादेत राहावे. त्यांनी जपून शब्द वापरायला पाहिजेत.
अमित शाहांनी झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. हे उघड करण्यासाठी आम्ही आलो आहोत. जिथे झोपडपट्ट्या, तिथे घरे, असं अमित शाह म्हणाले. पण, जिथे झोपडपट्ट्या, तिथे त्यांच्या मित्रांची आणि बिल्डरांची घरे, हे त्यांनी सांगितले नाही. त्यांचा मित्र कोण आहे, हे सर्व जगाला माहीतेय. त्यांना झोपडपट्टीची जमीन त्यांच्या मित्रांना द्यायची आहे. ते सांगत आहेत की, मोदी घरे बांधतील, पण 10 वर्षात 4 लाख झोपडपट्टीवासीयांसाठी फक्त 4700 घरे बांधली. यांच्या हातात सत्ता गेल्यावर हे लोक ही झोपडपट्ट्या उद्धवस्त करतील, अशी टीकाही केजरीवालांनी यावेळी केली.
2015 मध्येही झोपडपट्ट्या पाडणार होते, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर रात्री आलो आणि झोपडपट्ट्या उध्वस्त होण्यापासून वाचवल्या. त्यावेळी एका मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. दिल्लीतील जनतेने भाजपला मतदान केल्यास वर्षभरात सर्व झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करतील आणि तुम्हाला मारतील. गेल्या 10 वर्षात भाजपच्या लोकांनी झोपडपट्ट्या पाडून 3 लाख लोकांना बेघर केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.