दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच एका कारमधून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही कार दिल्लीमधील पंजाब भवन समोर उभी होती. त्यावर पंजाब सरकार असा उल्लेखही होता. दरम्यान, या कारमधून आम आदमी पक्षाची काही पत्रकंही सापडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी कार आणि त्यात सापडलेल्या रोख रकमेसह दारू जप्त करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
याबाबत दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबची नंबर प्लेट आणि पंजाब सरकार असा उल्लेख असलेली एक संशयास्पद कार कोपर्निकस मार्ग येथे असलेल्या पंजाब भवनाजवळ उभी होती. तपासणी केल्यावर या कारमधून लाखो रुपयांची रोख रक्कम, दारूच्या बाटल्या आणि आम आदमी पक्षाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी पुढीलल कारवाई तिलक मार्ग पोलीस ठाण्यामध्ये केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आळ्या आहेत. त्यावर पंजाब सरकारचे स्टिकर लावलेले होते. म्हणजेच ही कार पंजाबमधून दिल्लीमध्ये आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. गाडीमधून आठ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तर नियमानुसार आचार संहितेच्या काळात ५० हजारांहून अधिक रोख रक्कम सोबत बाळगता येत नाही.
आता या प्रकरणी भाजपाने आम आदमी पार्टीला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत आम आदमी पार्टीवर टीका केली आहे. काल जप्त करण्यात आलेल्या दारूच्या २०६९ बाटल्या आणि आज पटेलनगरमध्ये पकडण्यात आलेली पंजाबमध्ये तयार झालेली दारू ही पंजाब आणि दिल्ली सरकारच्या माध्यमातून आपची निवडणूक लढवण्याची व्यवस्था होत आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर सतर्कता वाढवावी आणि दिल्ली पोलीस आणि अबकारी विभागाला सक्त कारवाईचे आदेश द्यावेत.