विश्वास नगर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी लोकांना ५ फेब्रुवारी रोजी कमळाचं बटण दाबू नका असं म्हटलं आहे. जर असं झालं तर भाजपाचे लोक मोहल्ला क्लिनिक बंद करतील असं त्यांनी म्हटलं आहे.
"दिल्लीत 'कामाचं राजकारण' पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय राजधानीतील लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत. जर तुम्ही ५ फेब्रुवारी रोजी झाडू बटणाऐवजी दुसरं कोणतंही बटण दाबलंत तर उत्कृष्ट सरकारी शाळा आणि रुग्णालय (मोहल्ला क्लिनिक) उद्ध्वस्त होतील. तुमच्या आशीर्वादाने, आम्ही निवडणुकीनंतर महिला सन्मान योजना, संजीवनी योजना आणि पुजारी-ग्रंथी सन्मान यासारख्या योजनांवर काम करू."
“झोपडपट्ट्यांना काहीही होणार नाही”
"जर चुकून भाजपा सरकार दिल्लीत सत्तेत आलं, तर ते झोपडपट्ट्या तोडतील, पण जोपर्यंत तुमचा मुलगा केजरीवाल जिवंत आहे तोपर्यंत झोपडपट्ट्यांना काहीही होणार नाही" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. कृष्णा नगरमधील दुसऱ्या एका जाहीर सभेत ते म्हणाले की, ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीचे लोक ईव्हीएममधील झाडूचं बटण दाबून अरविंद केजरीवाल यांना पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री बनवतील.
"भाजपा आमदार १० वर्षे भांडत राहिले"
अरविंद केजरीवाल म्हणाले की, "विश्वास नगर विकासात मागे राहिलं कारण येथील लोकांनी भाजपा उमेदवाराला आमदार केलं. भाजपाचे आमदार १० वर्षे फक्त आमच्याशीच भांडत राहिले. यावेळी विश्वास नगर हे आपचे आमदार बनवतील. यासोबतच विश्वास नगरमध्ये विकासालाही चालना दिली जाईल." दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.