Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अडचणी वाढणार, ईडी चौथ्यांदा समन्स पाठवणार?; आप-भाजपामध्ये संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 08:00 AM2024-01-05T08:00:29+5:302024-01-05T08:13:20+5:30

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे.

delhi ed may issue fourth summons to Arvind Kejriwal 2024 | Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अडचणी वाढणार, ईडी चौथ्यांदा समन्स पाठवणार?; आप-भाजपामध्ये संघर्ष

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अडचणी वाढणार, ईडी चौथ्यांदा समन्स पाठवणार?; आप-भाजपामध्ये संघर्ष

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्य घोटाळ्याच्या संदर्भात हजर राहण्यासाठी त्यांना आता चौथ्यांदा समन्स पाठवला जाऊ शकतो. केजरीवाल यांनी ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता. हे समन्स बेकायदेशीर असल्याचा केजरीवालांचा आरोप फेटाळून लावत ईडी त्यांना नव्याने समन्स पाठवू शकते असं सूत्रांनी सांगितलं.

समन्सवरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे. ईडीला अद्याप पुरावे मिळालेले नाहीत, तर गेल्या दोन वर्षांपासून मद्य घोटाळ्याची चर्चा असून तपास यंत्रणेने अनेक छापे टाकले आहेत. केजरीवाल यांनी आरोप केला आहे की, तपास यंत्रणेने खोट्या प्रकरणात अनेक आप नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. आता भाजपाला त्यालाही चौकशीच्या निमित्ताने अटक करायची आहे. 

"खोटे आरोप आणि बनावट समन्स पाठवून प्रामाणिकपणावर घाला"

'आप'चा लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबवणे हा त्याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांची सर्वात मोठी संपत्ती प्रामाणिकपणा आहे. खोटे आरोप आणि बनावट समन्स पाठवून प्रामाणिकपणावर घाला घातला जात आहे. ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगून ते म्हणाले की, या प्रकरणी मी ईडीला काही प्रश्न विचारले आहेत, पण उत्तर मिळाले नाही. याचा सरळ अर्थ तपास यंत्रणेकडे मद्य घोटाळ्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. एजन्सीचे समन्स बेकायदेशीर आहे. 

"चौकशीच्या बहाण्याने अटक करायचीय"

बेकायदेशीर समन्सचे पालन का करायचे? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी कायदेशीरदृष्ट्या योग्य समन्स आल्यास पूर्ण सहकार्य करू, असे सांगितले. केजरीवाल म्हणाले की, भाजपा आणि तपास यंत्रणेचा हेतू या प्रकरणात कोणताही तपास करणे नसून त्यांना चौकशीच्या बहाण्याने अटक करायची आहे. यामुळे आपचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे, त्यामुळेच निवडणुकीपूर्वी त्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत, तर दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू आहे. सीबीआयने त्यांना आठ महिन्यांपूर्वी बोलावले होते आणि त्यांनी सीबीआयमध्ये जाऊन त्यांची सर्व उत्तरे दिली होती.

"भाजपामध्ये न येणारा नेता तुरुंगात जातो"

केजरीवाल म्हणाले की, आज भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना पकडत नाही, तर ईडी आणि सीबीआयचा वापर करून इतर पक्षांचे नेते फोडून त्यांना भाजपामध्ये सामील करून घेत आहे. अनेक प्रकरणांमध्ये, ईडी किंवा सीबीआयच्या तपासाला सामोरे जाणाऱ्या आणि गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या नेत्यांची सर्व प्रकरणे भाजपामध्ये सामील होताच बंद करण्यात आली आहेत किंवा थांबवण्यात आली आहेत. भाजपामध्ये न येणारा नेता तुरुंगात जातो. मनीष सिसोदिया, संजय सिंह हे तुरुंगात आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून नाही तर त्यांनी भाजपामध्ये येण्यास नकार दिला म्हणून असंही केजरीवालांनी म्हटलं आहे. 

 

Web Title: delhi ed may issue fourth summons to Arvind Kejriwal 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.