दिल्लीत महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला करणा-या डॉक्टरला अटक
By Admin | Updated: December 25, 2014 14:45 IST2014-12-25T11:08:14+5:302014-12-25T14:45:19+5:30
राजधानी दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात मंगळवारी एका महिला डॉक्टवर झालेल्या अॅसिड हल्लाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे.

दिल्लीत महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला करणा-या डॉक्टरला अटक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - राजधानी दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात मंगळवारी एका महिला डॉक्टवर झालेल्या अॅसिड हल्लाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. या कटात एकूण चार जण आरोपी असून त्यापैकी दोघांना या आधीच अटक करण्यात आली होती. सहपोलिस आयुक्त तेजिंदर लुथरा यांनी आरोपींच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक डॉक्टर, अजय यादव हा या हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार आहे. तो पीडित महिलेला अनेक वर्षांपासून ओळखत असून त्या दोघांनी एकत्र वैद्यकीय शिक्षणही घेतले आहे. दुस-या आरोपीचे नाव वैभव असून महिलेवर अॅसिड फेकताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेले अन्य दोन आरोपी आपण अल्पवयीन असल्याचा दावा करत आहेत. यादव हा पीडित महिलेच्या प्रेमात होता, मात्र तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिच्यावर सूड उगवण्यासाठी त्याने वैभवसोबत हा कट आखून तिच्यावर अॅसिड फेकले. त्या दोघांनी या अल्पवयीन आरोपींना २५ हजार रुपये देऊन तिच्यावर हल्ला घडवून आणला. त्या दोन्ही आरोपींनी प्रथम एका मोटरसायकल चोरली व पीडित महिलेवर हल्ला करून नंतर तिची बॅग खेचून हे सर्व चोरीचे प्रकरण असल्याचा बनाव रचला.
पीडित महिला मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे तिच्या स्कूटरवरून ईएसआय रुग्णालयात जात असताना हल्लेखोर मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी तिच्यावर अॅसिड फेकले. त्यानंतर त्यांनी तिच्या हातातील बॅग हिसकावून तेथून पळ काढला.
या हल्ल्यात पीडित महिलेच्या चेह-याची उजवी बाजू ५० टक्के भाजली असून, उजव्या डोळ्याचेही थोडे नुकसान झाले आहे. तिच्यावर एम्स रग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लायनंतर ही महिला बराच वेळ मदतीसाठी याचना करत होती मात्र कोणीच तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही, असे सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळले आहे. अखेर तिच्या शेजा-याने तिला मदत केली आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.