दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करणार
By Admin | Updated: February 14, 2015 23:38 IST2015-02-14T23:38:35+5:302015-02-14T23:38:35+5:30
येत्या पाच वर्षांत राजधानी दिल्लीतील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करून दिल्लीला देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य बनविण्याची ग्वाही दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिली

दिल्ली भ्रष्टाचारमुक्त करणार
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ग्वाही : व्हीआयपी संस्कृती संपविणार
नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत राजधानी दिल्लीतील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करून दिल्लीला देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य बनविण्याची ग्वाही दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिली. जनसेवेसाठी २४ तास काम, व्हीआयपी संस्कृती संपविणे व दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
रामलीला मैदनावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच तेथे उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमांची एक यादीच सादर केली; सोबतच आपच्या कार्यकर्त्यांना अहंकारापासून दूर राहण्याचा सल्लाही दिला. ते म्हणाले, एखादे मोठे यश पदरी पडले की अहंकारही जागृत होण्याची शक्यता असते आणि मग सर्वकाही मातीमोल होते. त्यामुळे सर्व मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांनी याबाबत सतर्क राहून आपण अहंकारी तर झालो नाही ना, याचा सतत विचार केला पाहिजे. यासंदर्भात त्यांनी पक्षाच्या काही नेत्यांनी देशातील इतर राज्यात निवडणूक लढण्यावर केलेल्या विधानांचा उल्लेख केला आणि त्यांच्या या वक्तव्यांवरून अहंकार निर्माण होत असल्याचे निदर्शनास येते, असे मत मांडले. काँग्रेसला लोकांनी पराभूत केले, कारण ते अहकांरी झाले होते. भाजपाला गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. परंतु यावेळी लोकांनी त्यांना नाकारले. कारण अहकांर! म्हणूनच आम्हाला यापासून दूर राहायचे आहे, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांना सतर्क केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अण्णा आंदोलन आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचा उल्लेख
अण्णा आंदोलन आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचा आपल्या भाषणात उल्लेख करून केजरीवाल म्हणाले, अण्णा आंदोलनादरम्यान भ्रष्टाचारमुक्त भारताची घोषणा देण्यात आली होती. त्यावेळी खरंच लोकपाल विधेयक आल्यानंतरही भारत भ्रष्टाचारमुक्त होऊ शकतो काय? असा संशय मनात होता. परंतु गेल्या वेळी ४९ दिवसांचे आप सरकार स्थापन झाले तेव्हा भ्रष्टाचार संपला होता, हे आमचे कट्टर विरोधकही मानतात. यावेळीही तसेच होईल, असा विश्वास आहे.
भ्रष्टाचार उघड करण्यासाठी स्टिंग आॅपरेशन करण्याचा सल्लाही त्यांनी दिल्लीकरांना दिला; तसेच भ्रष्टाचारविरोधी टेलिफोन लाईन सुरू करण्याचे आश्वासन दिले. जनलोकपाल विधेयक पारित करणे आवश्यक असून लवकरच त्या दिशेने वाटचाल सुरू करू, असे केजरीवाल यांनी सांगितले.
भाजपने दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे आणि केंद्र दिलेले वचन निश्चित पाळेल, अशी खात्री दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
दिल्लीच्या विकासाचा ऊहापोह करताना भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या पराभूत उमेदवार किरण बेदी आणि काँग्रेस नेते अजय माकन यांचा विशेष नामोल्लेख करून ते म्हणाले, बेदी मला मोठ्या बहिणीसमान आहेत. त्यांचे आम्ही वेळोवेळी सहकार्य घेऊ.
माकन यांना संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांचे मार्गदर्शनही आम्हाला लागणार आहे. एकाअर्थी विरोधकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
कवी प्रदीप यांच्या ‘इन्सान से इन्सान का हो भाईचारा’ गीताने भाषणाचा समारोप
दिल्लीतील चर्च आणि ईसाई समुदायाच्या संस्थांवरील हल्ल्यांचा त्यांनी तीव्र निषेध केला आणि सर्व समुदायांनी बंधूभाव आणि सद्भावनेने राहण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे आपली ही भावना त्यांनी गाण्यातून व्यक्त केली.
केजरीवाल यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप मानवता आणि बंधूभावाचा संदेश देणाऱ्या ‘पैगाम’ या चित्रपटाच्या गीताने केला. २०१३ च्या शपथविधीदरम्यानही त्यांनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि मन्ना डे यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत गायले होते.‘इन्सान से इन्सान का हो भाईचारा, यहीं पैगाम हमारा, यहीं पैगाम हमारा’