दिल्लीत फोडफोडी जोरात, काँग्रेसच्या कृष्णा तिरथ भाजपात
By Admin | Updated: January 19, 2015 14:41 IST2015-01-19T13:37:02+5:302015-01-19T14:41:05+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले असून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

दिल्लीत फोडफोडी जोरात, काँग्रेसच्या कृष्णा तिरथ भाजपात
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले असून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तिरथ यांनी सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तिरथ यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. किरण बेदी, शाझिया इल्मी आणि आता कृष्णा तिरथ यांना पक्षात घेऊन भाजपाने केजरीवालांविरोधात महिला आर्मी मैदानात उतरवल्याचे दिसते.
कृष्णा तिरथ यांनी युपीएच्या कार्यकाळात महिला व बालविकास खात्याच्या मंत्री म्हणून काम केले होते. सोमवारी सकाळी त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली व त्यांनंतर भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. 'मी कार्यकर्ता म्हणून पक्षात आले असून माझ्याकडे कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय भाजपा नेतृत्व घेईल' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कृष्णा तिरथ या दलित नेत्या असून दिल्लीतील दलित व्होटबँकेवर नजर ठेवून त्यांचा प्रवेश हा भाजपासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत १२ आरक्षित मतदारसंघापैकी आम आदमी पक्षाला तब्बल नऊ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपाला दोन आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला होता. कृष्णा तिरथ यांच्या मदतीने आपकडे जाणारे दलित मतदार भाजपाकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपा पक्षश्रेष्ठींनी केला आहे. तिरथ यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली जाईल अशी चर्चा आहे.