नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीत १० नोव्हेंबर २०२५ च्या संध्याकाळी जोरदार स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज आजही पीडितांच्या कानात गुंजत आहे. दिल्लीकर भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. पोलीस आणि तपास यंत्रणा दिवसरात्र एक करून या घटनेचा तपास करत आहेत. अनेक आरोपी आणि संशयित यांना पोलिसांनी पकडले आहे. त्यात अजूनही बरेच फरार आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये जो स्फोट झाला, त्यात अमोनियम नाइट्रेटचा वापर करण्यात आला होता. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला तर २५ हून अधिक जखमी आहे.
दिल्ली पोलीस आणि NIA तपासामुळे हे स्पष्ट आहे की, ही कुठलीही सामान्य दुर्घटना नाही तर दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा खतरनात व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूलचा एक भाग होता. जैश-ए-मोहम्मदचे भयानक व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्यूल काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये पसरलेले होते आणि त्यात प्रामुख्याने सुशिक्षित डॉक्टरांचा समावेश होता. दिल्ली स्फोटाच्या काही तास आधीच फरीदाबाद येथे २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. ज्यामुळे दिल्लीत स्फोट घडवण्याचा संशय असलेला डॉ. उमर घाबरला होता.
स्फोटानंतर काय होतं चित्र?
ही घटना १० नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६:५२ वाजता घडली. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील ट्रॅफिक सिग्नलवर हरियाणाहून येणारी एक हुंडई आय२० कार (एचआर २६ सीई ७६७४) थांबली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार पार्किंगमधून बाहेर पडताना दिसत होती, चालकाने काळा मास्क घातला होता. स्फोट होण्यापूर्वी सुमारे तीन तास ही कार सुनहेरी मशीद पार्किंगमध्ये उभी होती. तिथून निघाल्यानंतर काही वेळातच स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की जवळपासच्या अनेक वाहनांना आग लागली आणि चांदणी चौकातील रस्त्यावर हाहाकार माजला. लोक दुकानांमध्ये लपलेले दिसले.
या स्फोटामागे जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहरचे थेट कनेक्शन पुढे येत आहे. या मॉड्यूलचं प्लॅनिंग २६ नोव्हेंबरच्या सीरियल ब्लास्टसारखे होते. परंतु पोलिसांच्या धाडीमुळे घाबरलेल्या मुख्य संशयिताने घाईगडबडीत हा हल्ला केला. यासाठी फंडिंग पाकिस्तानच्या टेलिग्रॅम चॅनेल आणि क्रिप्टोकरेंसीच्या माध्यमातून झाले होते. या षडयंत्रात डॉ. उमर मोहम्मद होता, जो पुलवामाच्या कोइल गावातील ३६ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर होता. तो फरीदाबादच्या अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होता. दुसरा महत्त्वाचा आरोपी डॉ. आदिल अहमद हा होता. तो सहारनपूर येथे खासगी दवाखान्यात काम करायचा. त्याला जैशचे पोस्टर लावल्याप्रकरणी ५ नोव्हेंबरला अटक केली होती. त्याच्या लॉकरमधून एके ४७ जप्त करण्यात आली होती. त्याच्या चौकशीत उमर आणि मुझम्मिलची माहिती समोर आली.
पुलवामा येथील ३५ वर्षीय डॉक्टर मुझम्मिल शकील व्हाइट कॉलर टेररचा चेहरा होता. तो अल फलाह यूनिवर्सिटीत असिस्टेंट प्रोफेसर म्हणून काम करत होता. त्याच्या भाड्याने घेतलेल्या घरात २९०० किलो स्फोटके सापडली. ३० ऑक्टोबरला जैशचे पोस्टर लावल्यानंतर तो फरार होता. ९ नोव्हेंबरला फरीदाबाद येथून अटक करण्यात आली. त्यानंतर लखनौच्या लालबाग येथे राहणारी डॉ. शाहीन शहीद जैशच्या महिला विंगची भारतातील प्रमुख होती, तीदेखील अल फलाह यूनिवर्सिटीत काम करत होती. तिलाही ९ नोव्हेंबरला अटक झाली. ती २ वर्षापासून स्फोटके जमा करत होती. तिचे मुंबईतील जफर हयात याच्याशी लग्न झाले होते, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.
लखनौचा डॉ. परवेज अंसारी हा इंटीग्रल यूनिवर्सिटीत प्रोफेसर होता. परंतु त्याची मोठी बहीण डॉ. शाहीनच्या अटकेनंतर त्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. ७ नोव्हेंबर २०२५ ला त्याने अचानक ईमेल पाठवून नोकरी सोडली होती. ज्यामुळे तो फरार असल्याचा संशय आला. यूपी एटीएसने तातडीने कारवाई करत त्यालाही ताब्यात घेतले. स्फोटानंतर शाहीन आणि परवेज यांच्यात झालेला संवादही समोर आला आहे. पुलवामा येथील डॉ. सज्जाद अहमद मल्ला श्रीनगरच्या प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून आहे. परंतु त्याची मैत्री मुख्य संशयित डॉक्टर उमर मोहम्मदशी होती. ११ नोव्हेंबरला त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. कुलगाम जिल्ह्यातील डॉ. तजामुल अहमद मलिक यालाही ताब्यात घेण्यात आला आहे. तजामुलचं नाव उमर आणि मुझम्मिल नेटवर्कमधून फोन रेकॉर्ड्स ऐकून समोर आले. १२ तासाच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले आहे.
डॉ. निसार-उल-हसन कुठे आहे?
दिल्ली स्फोटाच्या चौकशीत फरीदाबादच्या अल-फलाह मेडिकल कॉलेजमधील वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. निसार-उल-हसन याचे नाव समोर आले, जेव्हा एनआयएने विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी सुरू केली. काश्मिरी वंशाचे हे डॉक्टर पूर्वी श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक होते, जिथे त्याला २०२३ मध्ये देशविरोधी कारवायांच्या संशयावरून काढून टाकण्यात आले होते. दिल्ली स्फोटानंतर निसार अचानक गायब झाला, ज्यामुळे जैश मॉड्यूलशी त्याचे संबंध असल्याचा संशय निर्माण झाला. तपास संस्था विद्यापीठ कॅम्पसमध्ये असतानाचे त्याचे फोन रेकॉर्ड, ईमेल आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, ज्यामुळे उमर आणि मुझम्मिल सारख्या अटक केलेल्या संशयितांशी त्याचे संबंध असल्याचे सिद्ध होत आहे. बेपत्ता निसारचा सध्या देशभर शोध सुरू आहे.
Web Summary : Delhi's 2025 blast, linked to Jaish, involved doctors and clerics. Key suspects arrested, including doctors with explosive connections. Mastermind Maulana Masood Azhar's role investigated; funding via Pakistani channels. Some remain at large.
Web Summary : दिल्ली में 2025 में हुए धमाके में जैश का हाथ, डॉक्टर और मौलवी शामिल। विस्फोटकों से जुड़े डॉक्टरों समेत कई गिरफ्तार। मास्टरमाइंड मसूद अज़हर की भूमिका की जांच, फंडिंग पाकिस्तानी चैनलों से। कुछ अभी भी फरार।