Delhi Assembly Election 2025 Exit Polls: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिहेरी लढत आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान झाले असून, ०८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी आहे. यातच दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर येऊ लागले आहेत. एक्झिट पोलनुसार, या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला जोरदार झटका बसू शकतो, तर भाजपाचे सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.
जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपा आणि आम आदमी पक्षात काँटे की टक्कर होऊ शकते. अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसू शकतो, तर भाजपा जोरदार कमबॅक करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. पीपल्स पल्स आणि कोडमो यांनी आपल्या एक्झिट पोलमध्ये ५१ ते ६० जागांसह भाजपा विजयी होत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव होऊ शकतो आणि आपच्या जागा २० पेक्षाही कमी होऊ शकतात. तसेच, काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाजही या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत वोटिंग पॅटर्न कसा राहिला?
यातच निवडणूक तज्ज्ञ मानले गेलेले यशवंत देशमुख यांनी दिल्लीत वोटिंग पॅटर्न कसा राहिला, याबाबत काही अंदाज वर्तवला आहे. यावेळी दिल्लीतील निवडणुका दोन भागात विभागल्या गेल्या. एका बाजूला पुरुष मतदारांना भाजपा सत्तेत हवी आहे. तर, दुसरीकडे महिलांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास कायम असून, आम आदमी पक्षाची सत्ता कायम राहावी, अशी इच्छा असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. दिल्लीतील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील महिला आणि पुरुषांची मते पूर्णपणे विभागली गेली आहेत. ही तफावत डबल डिजीटमध्ये जात आहे. तसेच एका बाजूला गरीब वर्ग, रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत, तर दुसऱ्या बाजूला उच्च वर्गीय मतदार आहेत, असे ते म्हणाले.
बजेटनंतर बदलला दिल्लीकरांचा सूर
पुरुष मतदारांचा कल भाजपाकडे आहे, तर महिलांचा कल आम आदमी पक्षाकडे आहे. महिलांना २१०० किंवा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले असले तरी ही बाब त्यांच्यासाठी महत्त्वाची नसून, मोफत बस प्रवास आणि मोहल्ला क्लिनिकसारख्या सुविधांचा त्यांच्यावर स्पष्टपणे परिणाम दिसून येत आहे. मध्यमवर्गीय पुरुष मतदारांबद्दल बोललो तर 'शीशमहाल'वरून अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा बदलली आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दिल्लीकरांचा सूर बदलला असून, त्यांचा कल भाजपाकडे असल्याचे दिसून येते, असे देशमुख यांनी म्हटले आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच २०२० मध्येही असेच घडले होते. परंतु, यावेळेस यामध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोलचे अंदाज काय?
matrize एक्झिट पोल-
बीजेपीः ३५-४० सीटआपः ३२-३५ सीटकाँग्रेसः २-३ सीट
चाणक्य एक्झिट पोल -
बीजेपीः ३९-४४ सीटआपः २५-२८ सीटकाँग्रेसः २-३ सीट
पोल डायरी एक्झिट पोल -
बीजेपीः ४२-५० सीटआपः १८-२५ सीटकाँग्रेसः ०-२ सीट
पीपल्स इनसाइड एक्झिट पोल -
बीजेपीः ४०-४४ सीटआपः २५-२९ सीटकाँग्रेसः ०-१ सीट
पी-मार्क एक्झिट पोल -
आप: २१-३१ सीटबीजेपी: ३९-४९ सीटकाँग्रेसः: ०-१ सीट