Rajnath Singh: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करी जवानांना अंतर्गत आणि बाह्य शत्रूंवर बारीक नजर ठेवण्याचे आवाहन केले आहे. भारत सुरक्षेच्या बाबतीत फारसा भाग्यवान नाही आणि आपण सतत आव्हानांचा सामना करत असतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. आपल्या उत्तर आणि पश्चिम सीमांना सतत आव्हानांचा सामना करावा लागतो, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं. त्यामुळे शत्रूंपासून सावध राहा असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महू छावणीत भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित केले. यावेळी त्यांनी लष्कराला सतर्क राहण्याचे आणि अंतर्गत आणि बाह्य धोक्यांवर बारीक लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. राजनाथ सिंह हे इंदूरमधील महू कॅन्टोन्मेंटच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला. इंदूरपासून २५ किमी अंतरावर असलेल्या महू कॅन्टोन्मेंटमध्ये तीन प्रमुख प्रशिक्षण संस्था आहेत. ज्यामध्ये आर्मी वॉर कॉलेज, मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि इन्फंट्री स्कूल यांचा समावेश आहे. याशिवाय येथे पायदळ संग्रहालय आणि आर्मी मार्क्समनशिप युनिट देखील आहे.
"सुरक्षेच्या परिस्थितीचा विचार करता भारत हा फारसा भाग्यवान देश नाही. कारण आपली उत्तर सीमा आणि पश्चिम सीमा सतत आव्हानांना तोंड देत आहे. आपण अंतर्गत आव्हानांचा सामना करत आहोत. या पार्श्वभूमीवर आपण गाफील राहू शकत नाही. आपले शत्रू, मग ते अंतर्गत असोत की बाह्य, नेहमीच सक्रिय असतात. अशा परिस्थितीत आपल्याला कडक नजर ठेवावी लागेल. त्यांच्या हालचालींवर आपण लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यांच्याविरूद्ध योग्य आणि वेळेवर प्रभावी पावले उचलली पाहिजेत," असं राजनाथ सिंह म्हणाले.
"भारताला २०४७ पर्यंत विकसित आणि स्वावलंबी देश बनवण्यासाठी लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशाचा संरक्षण मंत्री या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण नेहमी सतर्क राहिले पाहिजे. जेव्हा मी इथं आलो आणि तुम्ही ज्या शिस्तबद्धतेने आणि समर्पणाने तुम्ही प्रशिक्षण घेत आहात ते पाहिले तेव्हा मी खूप प्रभावित झालो आह. तुमचे प्रशिक्षण हे कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही. अशी शिस्त राखण्यासाठी समर्पण आणि दृढनिश्चय आवश्यक असतो," असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.