'छपाक'वर बहिष्कार घालायला गेले अन् तोंडावर पडले; जाणून घ्या नेमके काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 08:44 AM2020-01-09T08:44:21+5:302020-01-09T08:47:33+5:30

छपाकची तिकीटं रद्द करत असल्याचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल

Deepika Padukones JNU visit many people cancelled same tickets of Chhapaak | 'छपाक'वर बहिष्कार घालायला गेले अन् तोंडावर पडले; जाणून घ्या नेमके काय घडले

'छपाक'वर बहिष्कार घालायला गेले अन् तोंडावर पडले; जाणून घ्या नेमके काय घडले

googlenewsNext

मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं भाजपा नेत्यांकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणवर टीका सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी दीपिकानं जेएनयूच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. यानंतर दीपिका तुकडे-तुकडे गँगची सदस्य असल्याची टीका भाजपा नेत्यांकडून करण्यात आली. दीपिकाच्या आगामी छपाक चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं आवाहन सोशल मीडियावरुन करण्यात आलं. त्यासाठी #boycottchhapaak वापरण्यात आला.

दीपिकानं जेएनयूच्या कॅम्पमध्ये जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेणं सोशल मीडियावर काहींना रुचलेलं नाही. त्यामुळेच दीपिकाच्या छपाक चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन ट्विटरवरुन करण्यात येत आहे. अनेकांनी तर छपाकची तिकीटं आपण रद्द केल्याचं म्हणत तसे स्क्रिनशॉट्सदेखील ट्विटरवर शेअर केले आहेत. अधिकाधिक लोकांनी छपाकवर बहिष्कार घालावा या उद्देशानं हे स्क्रिनशॉट्स शेअर केले जात आहेत. पण ही सगळी तिकिटं अगदी सारखीच असल्याचं लक्षात येत आहे. 





१० जानेवारीला म्हणजे उद्या छपाक चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटावर अधिकाधिक जणांनी बहिष्कार टाकावा यासाठी ट्विटरवरुन आवाहन करणाऱ्या अनेकांनी आपण चित्रपटाची तिकीटं रद्द केल्याचं म्हटलं आहे. छपाक चित्रपटाची तिकीटं रद्द करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पण गंमत म्हणजे या सगळ्यांनी सारखीच तिकीटं रद्द केली आहेत. वडोदऱ्यातील अकोटामध्ये असणाऱ्या सिनेमार्क चित्रपटगृहात १० जानेवारीला संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी दाखवल्या जाणाऱ्या छपाकची तिकीटं रद्द करण्यात आल्याचं अनेकांच्या ट्विटमधून दिसतं. या सगळ्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या स्क्रिनशॉट्सवर नीट नजर टाकल्यास त्यावर गोल्ड क्लासमधील A8, A9 आणि A10 या सीट्सचा उल्लेख दिसेल. तिकीटं रद्द केल्यामुळे या सगळ्या मंडळींना ४२० रुपये परत मिळाले आहेत. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकणारी सगळी मंडळी एकाच चित्रपटगृहात जाऊन फक्त तीन खुर्च्यांवर जाऊन बसणार होती की काय, असा गमतीशीर प्रश्न विचारला जात आहे. 



Web Title: Deepika Padukones JNU visit many people cancelled same tickets of Chhapaak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.