सिंधू नदीवर चीन बनवणार डायमर-भाषा धरण, पाकचा दावा
By Admin | Updated: June 20, 2017 17:47 IST2017-06-20T17:30:08+5:302017-06-20T17:47:04+5:30
चीन सिंधू नदीवर धरण बांधून देणार असल्याचा दावा आता पाकिस्ताननं केला आहे.

सिंधू नदीवर चीन बनवणार डायमर-भाषा धरण, पाकचा दावा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - चीन आणि पाकिस्तानची मैत्री सर्वश्रुत आहे. भारतावर कुरघोडी करण्यासाठी चीन नेहमीच पाकिस्तानला पाठबळ देत असतो. चीन सिंधू नदीवर धरण बांधून देणार असल्याचा दावा आता पाकिस्ताननं केला आहे. चीन पाकिस्तानला बांधून देणारं धरण हे पाक-चीन आर्थिक कॉरिडोरचाच एक भाग असल्याचंही पाकिस्तानमधील रेडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.
सिंधू नदीवर डायमर-भाषा धरण चीन बांधून देणार असल्याची माहिती पाकिस्तानातील नॅशनल असेंब्लीच्या एका समितीनं दिली आहे. गेल्या महिन्यातच पाकिस्तानमधले नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनीही रॉयटर या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी सिंधू नदीवरील धरणासाठी चीन आर्थिक मदत करेल, अशी पाकिस्तानला आशा आहे, असंही अहसान इक्बाल म्हणाले होते. सिंधू नदीवर डायमेर-भाषा धरण बांधण्यासाठी भारताचा विरोध असल्यामुळेच जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँकेनं निधी देण्यास नकार दिला आहे.
डायमर-भाषा धरणाचा प्रोजेक्ट गिलगिट आणि बाल्टिस्तान भागात होणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी अमेरिकेनंही हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी पाठिंबा दर्शवला होता. मात्र भारतानं जाहीर विरोध केल्यानंतर अमेरिकेनं काढता पाय घेतला. राज्य वीज उपयोगिता अध्यक्ष मुझिल हुसेन यांच्या मते, सद्यस्थितीत सीपीईसीमध्ये कोणताही हायड्रो-पॉवर प्रोजेक्ट समाविष्ट नाही. त्यामुळे पाकिस्तान आणि चीननं डायमर-भाषा धरण बांधण्यासंदर्भात गांभीर्यानं विचार करण्यात काय हरकत आहे. दोन वर्षांपूर्वीच पाकिस्तानला या धरणासाठी जागतिक बँकेनं कर्ज देण्यास नकार दिला होता. कारण पाकिस्ताननं या प्रोजेक्टसाठी भारताकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलं नव्हतं.