'भगवद गीता' राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा - सुषमा स्वराज
By Admin | Updated: December 8, 2014 12:04 IST2014-12-08T09:48:50+5:302014-12-08T12:04:32+5:30
'भगवद् गीते'ची राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषणा करण्यात यावी अशी मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.

'भगवद गीता' राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा - सुषमा स्वराज
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - धार्मिक ग्रंथ 'भगवद् गीते'ची राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषणा करण्यात यावी अशी मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे. दरम्यान त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे असून काँग्रेस व तृणमूल काँग्रेसकडून स्वराज यांच्यावर टीका करण्यात येत आहे. लोकशाहीमध्ये 'संविधान' हाच सर्वात मोठा पवित्र ग्रंथ आहे, असे प्रत्युत्तर तृणमूलतर्फे देण्यात आले आहे.
लाल किल्ला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या गीता प्रेरणा महोत्सवादरम्यान त्या बोलत होत्या. परराष्ट्र मंत्रालयातील अनेक आव्हानांना आपण फक्त भगवद् गीतेमुळेच सामोरे जाऊ शकलो असे सांगत
जीवनातील प्रत्येक समस्येचे, प्रश्नाचे उत्तर गीतेत दिले आहे, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना जेव्हा ' भगवद् गीता' भेट दिली तेव्हाच तिला राष्ट्रीय स्वरुप प्राप्त झाले. आता याची फक्त औपचारिक घोषणा करणे बाकी आहे. भगवद् गीता तुमच्या आयुष्यातील सर्व निराशांवर मात करेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनीही हिंदूच्या पवित्र ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता द्यावी या मागणीचा पुनरुच्चार केला.