खातेवाटप जाहीर, गृह व नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडेच
By Admin | Updated: November 2, 2014 16:00 IST2014-11-02T09:54:45+5:302014-11-02T16:00:47+5:30
रविवारी राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास हे दोन्ही महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवली आहेत.
खातेवाटप जाहीर, गृह व नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडेच
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - शपथविधी सोहळ्याच्या दोन दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास हे दोन्ही महत्त्वाची खाती स्वतःकडेच ठेवली आहेत. तर एकनाथ खडसेंकडे महसूल आणि सुधीर मुनगंटीवारांकडे अर्थ खाते देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नऊ मंत्र्यांचा शुक्रवारी शाहीथाटात शपथविधी पार पडला. शनिवारी खातेवाटप करु असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र सर्व मंत्र्यांनी आपल्या मनाप्रमाणेच खाते देण्याचा आग्रह केल्याने खातेवाटप होऊ शकले नाही. अखेरीस रविवारी दुपारी मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले.
मंत्री आणि त्यांच्याकडे सोपवलेली खाती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह आणि नगरविकास खाते
एकनाथ खडसे - महसूल मंत्रालय. याशिवाय वक्फ बोर्ड, अल्पसंख्यांक मंत्रालय, कृषी खाते, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क खात्यांचा अतिरिक्त कार्यभार
सुधीर मुनगंटीवार - अर्थ आणि वन खाते
विनोद तावडे - शालेय शिक्षण, उच्चशिक्षण, वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण विभाग. तसेच सांस्कृतिक मंत्रालय आणि मराठी भाषा संवर्धन विभागाचा अतिरिक्त कार्यभार.
चंद्रकांत पाटील - सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग खाते.
पंकजा मुंडे - ग्रामविकास खाते. याशिवाय जलसंधारण, महिला आणि बाल कल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार
विष्णू सावरा - आदिवासी विकास मंत्रालय आणि सामाजिक न्यायमंत्रालय
प्रकाश मेहता - उद्योग आणि खाण मंत्रालय. संसदीय कार्यमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार
दिलीप कांबळे - आदिवासी आणि समाजकल्याण विभागाचे राज्यमंत्री
विद्या ठाकूर - ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण विभागाच्या राज्यमंत्री
उर्वरीत खाती पुढील मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहतील.