बेपत्ता पाक अधिका-याचा कुलभूषण यांच्या फाशीशी संबंध?
By Admin | Updated: April 12, 2017 10:42 IST2017-04-12T10:41:02+5:302017-04-12T10:42:00+5:30
पाकिस्तानी लष्करातील बेपत्ता निवृत्त लेफ्ट.कर्नल मोहम्मद हबीब झहीर यांचा संबंध भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशी शिक्षेसोबत असल्याचे म्हटले जात आहे.

बेपत्ता पाक अधिका-याचा कुलभूषण यांच्या फाशीशी संबंध?
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - नेपाळ-भारतीय सीमा परिसरातून बेपत्ता झालेले पाकिस्तानी लष्करातील निवृत्त लेफ्ट.कर्नल मोहम्मद हबीब झहीर यांचा संबंध भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशी शिक्षेसोबत असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय, झहीर भारताच्या ताब्यात असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
"इंडियन एक्स्प्रेस"च्या बातमीनुसार, कुलभूषण जाधव यांचे मार्च 2016मध्ये अपहरण करणा-या पथकात मोहम्मद हबीब झहीर याचाही समावेश होता. भारतीय यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून झहीरच्या मागावर होती. यानंतर झहीर नेपाळजवळच्या लुंबिनी येथे शेवटचा दिसला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जाधव यांचा मागोवा घेणा-या पथकाचं नेतृत्व करणा-या झहीरला भारत-नेपाळ सीमेवर 3 एप्रिल रोजी अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
झहीर भारताच्या ताब्यात असल्याची माहिती मिळताच घाईघाईत पाकिस्ताननं जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्याची घोषणा केली.
कोण आहे लेफ्ट.कर्नल मोहम्मद हबीब झहीर ?
पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार, झहीर हा 2014 साली पाकिस्तान लष्करातून निवृत्त झाला. लष्करातून निवृत्त झाल्यानंतरही तो पाकिस्तानीची गुप्तचर संस्था ISI साठी काम करत होता. त्याच्या कारवायांमध्ये तो सहभागी होता.
दरम्यान, 6 एप्रिलपासून झहीरबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गुरुवारी दुपारी त्याने कुटुंबीयांसोबत संपर्क साधला होता. झहीरच्या कुटुंबानं दावा केला आहे की 5 एप्रिलला एका कामानिमित्त तो नेपाळमध्ये गेला होता आणि त्याचवेळी लुंबिनीमध्ये भारतीय सीमेपासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावरुन तो गायब झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, पाकिस्ताननं झहीरच्या गायब होण्यामागे भारताचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानने हेरगिरीचा ठपका ठेवलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे भारताचे गुप्तहेर नव्हे तर व्यावसायिक व सर्वसामान्य भारतीय आहेत. पाकिस्तानने त्यांना सन्मानाने सोडायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करत जाधव यांच्या सुटकेसाठी सरकार म्हणून जे काही करता येईल ते सर्व करू. वाट्टेल ते करून जाधव यांना सोडवण्याचा भारत सरकारचा निर्धार आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यातील मुलाखतीत दिली.