मद्य व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:18+5:302015-02-13T00:38:18+5:30

मद्य व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला
>कारची धडक : रॉड, दंड्याने मारहाण नागपूर : सीताबर्डीतील मद्य व्यावसायिक राजीव ऊर्फ राजू जयस्वाल यांच्यावर आज दुपारी एमआयडीसीतील मद्य व्यावसायिक पप्पू जयस्वालने आपल्या साथीदाराच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्लयात राजू जयस्वाल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेमुळे उपराजधानीतील मद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.आरोपी पप्पू जयस्वाल हा एमआयडीसीत रायफल बार चालवायचा. मंजूर नकाशापेक्षा जास्त आणि चुकीचे बांधकाम केल्यामुळे नासुप्रने २ फेब्रुवारीला रायफल बारचे अतिक्रमण तोडले. तिकडे राजू यांनी पप्पूच्या प्रतिस्पर्धी बार मालकाला व्यवसाय वाढीसाठी मदत केल्याच्या संशयामुळे पप्पू जयस्वाल संतापला. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी ३ च्या सुमारास राजू आपल्या होंडा सिटी कारने एमआयडीसीतून घराकडे जात असताना सेंट झेवियर स्कूलजवळ आरोपी पप्पू आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या कारला एक्सयूव्हीने (एमएच ३१/ ईए ५६७) जोरदार धडक मारली. धोका लक्षात आल्यामुळे राजू यांनी कारमधून बाहेर निघून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी पप्पू, अशोक वाघमारे आणि इतरांनी पाठलाग करून राजूला पकडले आणि त्यांच्यावर रॉड तसेच बेस बॉलच्या दंड्याने (स्टीक) जोरदार हल्ला चढवला. डोक्यावर आणि पायावर फटके पडल्यामुळे राजू गंभीर जखमी झाले. वर्दळीच्या मार्गावर ही घटना घडल्यामुळे आजूबाजूच्यांनी धाव घेतली. जमावातील काहींनी आरोपींना पकडले. माहिती कळताच एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी जयस्वाल यांना त्यांच्या मित्रांच्या मदतीने वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. राजू यांच्या डोक्याला चार ते पाच टाके लागल्याची माहिती असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.---आरोपी कुख्यात गुंडआरोपी पप्पू आणि अशोक वाघमारे या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील अशोक हा नंदनवनमधील कुख्यात गुंड असून, हत्या आणि अन्य गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याचे एमआयडीसी पोलीस सांगतात. ----