विमान प्रवाशांचे मृतदेह आसनाला जखडलेले?
By Admin | Updated: January 3, 2015 02:37 IST2015-01-03T02:37:03+5:302015-01-03T02:37:03+5:30
एअर आशियाच्या दुर्दैवी जेट विमानाचे अवशेष जावा समुद्रात ५ कि.मी. परिसरा पसरले असून, शोधपथकाने आज ३० मृतदेह वर आणले आहेत

विमान प्रवाशांचे मृतदेह आसनाला जखडलेले?
मोठा सांगाडा, ब्लॅक बॉक्ससाठी शोधमोहीम : ३० मृतदेह सापडले, तिघांची ओळख पटली
जकाता/सिंगापूर : रविवारी गूढरीत्या अपघातग्रस्त झालेल्या एअर आशियाच्या दुर्दैवी जेट विमानाचे अवशेष जावा समुद्रात ५ कि.मी. परिसरा पसरले असून, शोधपथकाने आज ३० मृतदेह वर आणले आहेत. त्यापैकी तिघांची ओळख पटली आहे; तर शोधपथकाच्या मते राहिलेले १३२ मृतदेह अजूनही विमानाच्या आसनाला जखडलेले आहेत.
समुद्रतळाशी असणाऱ्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी बहुराष्ट्रीय शोध पथकाकडे अत्याधुनिक उपकरणे आहेत. एअर बस ३२० च्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी अपघात स्थळी लक्ष कें द्रित करण्यात आले असून, विमानाचा ब्लॅकबॉक्स शोधणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. शोधमोहिमेसाठी वादळग्रस्त हवा ही प्रमुख चिंता होती. रविवारपर्यंत पाऊस, जोरदार वारे व चार मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या, असे इंडोनेशियाच्या मदत पथकाचे प्रमुख रिअर मार्शल हेन्री बाम्बांग सोएलिसियो यांनी म्हटले आहे. विमानाचा मोठा सांगाडा शोधणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे, तर विमानाचा ब्लॅकबॉक्स शोधणे हे दुसरे महत्त्वाचे काम, असे सोएलिसियो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (वृत्तसंस्था)
शोधपथकातील फ्रॉग टीम समुद्राच्या तळापर्यंत जात असून विमानाचा सांगाडा शोधला जात आहे. १६२ पैकी ३० मृतदेह आतापर्यंत हाती लागले असून, बाकीचे मृतदेह एअर आशियाच्या दुर्दैवी विमानातील आसनालाच अजूनही जखडलेले असावेत असा अंदाज आहे. पाणबुडे बांदा एक येथील नौदलाच्या जहाजात असून विमानाचा सांगाडा असणाऱ्या ठिकाणी ते पाण्यात उडी घेण्यास सज्ज आहेत. हा सांगाडा लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे.