शिलाँगला हनिमूनसाठी गेलेले नवदाम्पत्य बेपत्ता झाले होते. त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटी पडलेल्या अवस्थेत सापडली होती. यापैकी पती राजाचा मृतदेह सापडला आहे. डबल डेकर मार्गावरील दरीत राजाचा मृतदेह सापडला होता. त्याच्या कुटुंबियांनी ओळख पटविली असून सोनम मात्र अद्याप सापडलेली नाही.
राजा आणि सोनम यांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने, तसेच तेथील पोलीस काहीच सहकार्य करत नसल्याने या दोघांची माहिती देण्याऱ्यास राजाच्या कुटुंबाने १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तरीही त्यांची काहीच माहिती मिळत नव्हती. अखेर पोलिसांना सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला होता. त्याची राजाच्या कुटुंबाकडून ओळख पटविण्यात आली.
इंदूरचे वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम लग्नानंतर हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. सुरुवातीचे तीन दिवस ते कुटुंबाच्या संपर्कात होते. तिथे फिरण्यासाठी त्यांनी स्कूटर भाड्याने घेतली होती. दोघांचेही मोबाईल फोन बंद येऊ लागले आणि कुटुंबाला चिंता वाटू लागली होती. या घटनेला आता ११ दिवस झाले. फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी शिलाँग गाठले आणि प्रशासनाकडे त्यांना शोधण्याची विनंती केली. परंतू, पोलिसांकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर हे प्रकरण प्रसारमाध्यमांत आल्यावर हालचाली सुरु झाल्या.
राजा आणि सोनमने फिरण्यासाठी घेतलेली स्कूटर पोलिसांना सापडली. परंतू, या दोघांचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी लक्ष घालून या प्रकरणी मेघालयच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दिल्लीहून केंद्रीय गृह मंत्रालय सक्रीय झाले आणि मेघालय सरकारने शोधाशोध करण्यास सुरुवात केली. खराब हवामानामुळे नवविवाहित जोडप्याच्या शोध मोहिमेत अडथळा निर्माण झाला होता. शिलाँग पोलिस राजाची पत्नी सोनमचा शोध घेत आहेत.