दाऊदचा हस्तक गोव्यात जेरबंद
By Admin | Updated: February 16, 2015 03:40 IST2015-02-16T03:40:46+5:302015-02-16T03:40:46+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या गँगमधील ‘ब्लॅक स्कॉर्पियॉन’ म्हणून ओळखला जाणारा शार्प शूटर श्याम किशोर गरिकापट्टी याला गोवा पोलिसांनी साळगाव येथे जेरबंद केले.

दाऊदचा हस्तक गोव्यात जेरबंद
पणजी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या गँगमधील ‘ब्लॅक स्कॉर्पियॉन’ म्हणून ओळखला जाणारा शार्प शूटर श्याम किशोर गरिकापट्टी याला गोवा पोलिसांनी साळगाव येथे जेरबंद केले.
पणजीपासून उत्तरेला सुमारे आठ किलोमीटरवरील साळगाव येथे तो भाड्याच्या बंगल्यात आठ वर्षे राहत होता. त्याच्यावर खून, खंडणी यासारखे सुमारे १९ गुन्हे महाराष्ट्र पोलिसांनी नोंदविले आहेत. श्याम किशोर गरिकापट्टी कडवा अतिरेकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी रात्री गुन्हा अन्वेषण विभाग आणि उत्तर गोवा जिल्हा पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी पोलिसांना हवा असलेला गरिकापट्टी साळगाव येथे चोघम रोडजवळ राहत असल्याची माहिती एक दिवसापूर्वी गोवा पोलिसांना मिळाली होती, असे पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. रंगनाथन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जामिनावर सुटल्यानंतर अटींचे उल्लंघन करून गरिकापट्टी पळाला होता. मुंबई पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यामुळे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्या घरातून नऊ इंची पिस्तूल जप्त केले. त्याच्याजवळ बोगस ओळखपत्र व अनेक बनावट कागदपत्रे सापडली. (प्रतिनिधी)