दाऊद, हाफिजने निश्चिंत राहू नये
By Admin | Updated: September 8, 2015 04:06 IST2015-09-08T04:06:14+5:302015-09-08T04:06:14+5:30
दाऊद इब्राहीम, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद यांच्यासारख्या भारताच्या शत्रूंनी आपल्याबद्दल भारत विचारच करणार नाही असा विश्वास बाळगू नये, त्यांना संपविण्यासाठी

दाऊद, हाफिजने निश्चिंत राहू नये
नवी दिल्ली : दाऊद इब्राहीम, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद यांच्यासारख्या भारताच्या शत्रूंनी आपल्याबद्दल भारत विचारच करणार नाही असा विश्वास बाळगू नये, त्यांना संपविण्यासाठी भारत सदैव तत्पर आहे, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दिला.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि भारताला हवा असलेला सईद पाकिस्तानात शांततेत जगत आहे. सरकार त्यांच्याबाबत काय करीत आहे, असा प्रश्न त्यांना आजतक वाहिनीच्या ‘सिधी बात’ या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. मोदी सरकार येऊन १५ महिने उलटले आहेत.
विशेष मोहीम, की छुपी मोहीम छेडली जाणार? या प्रश्नावर ते म्हणाले की, विशेष मोहीम म्हणा किंवा छुपी मोहीम असो, ती पार पाडल्यानंतरच त्याची माहिती द्यायची की नाही हा निर्णय सरकारवर अवलंबून असतो. अशा मोहिमा पार पाडल्यानंतरच त्याबाबत वाच्यता केली जाते.
पाकिस्तानात आश्रयाला असलेल्या फरार आरोपींबाबत दस्तऐवज (डोझियर) तयार करण्याशिवाय काहीही करण्यात आलेले नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी डोझियरशिवाय साम, दाम, दंड, भेद असे सर्व मार्ग अवलंबले जातील, असे स्पष्ट केले.
दाऊदच्या मालमत्तेवर जप्ती
संयुक्त अरब अमिरातने (यूएई)दाऊदची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचा दौरा केला तेव्हा त्याबाबत करार झाला होता. पंतप्रधानांसोबत दौऱ्यावर असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यावेळी यूएईकडे दाऊदच्या मालमत्तेसंबंधी यादी सोपविली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)