दाऊद आफ्रिकेतील रक्तरंजित हिरे व्यापारातही सक्रीय
By Admin | Updated: August 30, 2015 17:53 IST2015-08-30T17:53:04+5:302015-08-30T17:53:12+5:30
रिअल इस्टेट, तस्करी, हवाला, बेटिंग, बनावट नोटा अशा विविध उद्योगांमध्ये सक्रीय असलेल्या दाऊद इब्राहिमने आता त्याचा मोर्चा आफ्रिकेतील रक्तरंजित हिरे व्यवसायाकडे वळवला आहे.

दाऊद आफ्रिकेतील रक्तरंजित हिरे व्यापारातही सक्रीय
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - रिअल इस्टेट, तस्करी, हवाला, बेटिंग, बनावट नोटा अशा विविध उद्योगांमध्ये सक्रीय असलेल्या दाऊद इब्राहिमने आता त्याचा मोर्चा आफ्रिकेतील रक्तरंजित हिरे व्यवसायाकडे वळवला आहे. अजित डोवल यांच्या आदेशानंतर गुप्तचर यंत्रणांनी दाऊदच्या उद्योगधंद्यांची माहिती घ्यायला सुरुवात केली असून यात दाऊद आफ्रिकेतील हिरे व्यवसायात सक्रीय असल्याचे उघड झाले आहे.
आफ्रिका खंडातील काँगो, सिएरा लिओन, अंगोला यासारख्या देशांमध्ये हि-यांचा खाणी असून या हि-यांची दहशतवादी संघटांनकडून विक्री केली जाते. या हिरेविक्रीतून मिळालेल्या अमाप पैशाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जातो. त्यामुळे या हि-याला ब्लड डायमंड म्हणजेच रक्तरंजित हिरे म्हणून ओळखले जाते. या हि-यांच्या खरेदी विक्रीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने बंदी टाकली आहे. या रक्तरंजित हि-यांच्या व्यापारात आता दाऊद इब्राहीमने उडी घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार झिम्बाब्वे व केनिया येथे दाऊदचे नेटवर्क असून याच माध्यमातून हा व्यापार केला जात असल्याचे समजते. या हि-यांची दुबईत तस्करी जात असल्याचे समजते. आफ्रिकेत रेहमत नावाचा दाऊदचा निकटवर्तीय असून तोच हा व्यापार सांभाळत असल्याचे वृत्त आहे. रेहमत आफ्रिकेतील महिला व तरुणांचा हिरे तस्करीत कुरियर म्हणून वापरतो. दुबईत दाऊदच्या अल नूर डायमंड या कंपनीच्या माध्यमातून या हि-यांची विक्री होते. दुबईतील एका फेरीत सुमारे ५ ते १० लाख डॉलर्स किंमतीच्या हि-यांची तस्करी होती. यात एका आफ्रिकन कुरियला सुमारे १० हजार डॉलर्सचा मोबदला दिला जातो. दाऊदच्या या हिरेव्यापाराविषयी आणखी माहिती जमा केली जात असून दाऊदचे आणखी उद्योगही लवकरच उघड होतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.