दाऊद १०० टक्के तंदुरुस्त - छोटा शकील
By Admin | Updated: April 26, 2016 11:09 IST2016-04-26T09:05:12+5:302016-04-26T11:09:44+5:30
पायाला गँगरिन झाल्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पलंगाला खिळल्याचे वृत्त दाऊदचा जवळचा सहकारी छोटा शकीलने फेटाळून लावले आहे.

दाऊद १०० टक्के तंदुरुस्त - छोटा शकील
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - पायाला गँगरिन झाल्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पलंगाला खिळल्याचे वृत्त दाऊदचा जवळचा सहकारी छोटा शकीलने फेटाळून लावले आहे. दाऊद इब्राहिम पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने छोटा शकील आणि वरिष्ठ गुप्तचर अधिका-यांच्या हवाल्याने दिले आहे. डी-कंपनीचे व्यावसायिक नुकसान करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत असे छोटा शकीलने म्हटले आहे.
कराचीतील क्लिफटन एरियामधील दाऊदच्या घराजवळ काही डॉक्टरांना पाहिल्यानंतर दाऊदची प्रकृती ढासळल्याच्या बातम्या पसरण्यास सुरुवात झाली. दाऊदच्या पायाला गॅंगरिन झाले असून, त्याचे विष शरीराच्या अन्य भागात पसरु नये यासाठी दाऊदचा पाय कापणार असल्याच्या बातम्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदची कराचीत दोन ते तीन घरे असून, सध्या त्याने हि-याच्या नव्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले आहे.