वर्दीच्या आतही एक संवेदनशील माणूस असतो, याचा प्रत्यय मध्य प्रदेशातील दतिया येथे आला. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या मातृत्वाच्या भावनेने सध्या सर्वांची मनं जिंकली आहेत.
दतिया जिल्ह्यातील फुलरा गावात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून चिरुला पोलीस आणि टीमने 'कंजर डेरा' या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच तेथे उपस्थित असलेले सर्व स्त्री-पुरुष पळून गेले. मात्र घाईघाईत पळून जाताना ते आपल्या पोटच्या मुलाला तिथेच सोडून गेले.
तपास सुरू असताना पोलिसांना एका बेडवर एक नवजात बाळ रडताना दिसलं. कडाक्याच्या थंडीत भुकेने व्याकुळ झालेल्या त्या बाळाला पाहून पथकातील महिला पोलीस अधिकारी आकांशा जैन यांचं मन हेलावलं. एसडीओपी (SDOP) आकांशा जैन यांनी तत्काळ त्या बाळाला कुशीत घेतलं, त्याला प्रेमाने थोपटलं आणि स्वतः बाटलीने दूध पाजलं. इतकंच नाही तर थंडीपासून वाचवण्यासाठी त्यांनी बाळाला ऊबदार कपडेही घातले.
एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला अशा प्रकारे 'माता' बनून बाळाची काळजी घेताना पाहून उपस्थित कर्मचारी आणि गावकरीही भावूक झाले. २५ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी आकांशा जैन यांच्यातील मातृत्वाला सलाम करत असून त्यांना 'वर्दीतली आई' म्हणून संबोधत आहेत. त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत.