उत्तर प्रदेशमधील संभल येथे राजा आत्मा राम यांच्या ऐतिहासिक बारवीमध्ये सुरू असलेलं खोदकाम आज तेराव्या दिवशी २५ फुटांपर्यंत पोहोचलं आहे. यादरम्यान, बारवीमधील दुसऱ्या मजल्याचं गेट समोर आलं आहे. त्यानंतर एएसआयच्या पथकाने आत प्रवेश करून सर्व्हेक्षण केलं. तसेच सर्व्हेदरम्यान काही धोकादायक संकेतही मिळाले आहेत.
एएसआयच्या टीमने जेव्हा आत सर्व्हे केला तेव्हा या बारवीमधील भिंती कमकुवत असल्याचे, तसेच आत ऑक्सिजनची कमतरता असल्याचे संकेत मिळाले आहेत. ही परिस्थिती पाहून पुरातत्त्व खात्याने (एएसआय) मजुरांना दुसऱ्या मजल्याच्या आत जाण्यापासून रोखले आहे. तसेच खोदकामही अगदी सावधपणे करण्याची सूचना दिली आहे.
संभलमधील चंदौसी येथे ऐतिहासिक बारव सापडल्यानंतर तिथे खोदकामास सुरुवात झाली होती. तसेच आतापर्यंत या बारवीमधून २५ फुटांपर्यंतची माती बाहेर काढण्यात आली आहे. त्याबरोबरच राजा आत्मा राम यांच्या बारवीमधील दुसरा मजला दिसू लागला आहे. दुसऱ्या मजल्याच्या गेटवरून मातीचा ढिगा हटवताच पुरातत्त्व खात्याचं पथक आत उतरलं आणि सर्व्हे केला.
एएसआयची टीम जेव्हा सर्व्हे करून बाहेर आली तेव्हा मजुरांना दुसऱ्या मजल्याच्या आत न जाण्याच्या सूचना दिल्या. या दरम्यान, माती हटवण्याचं काम करत असलेल्या मजुरांनी बारवीच्या दुसऱ्या मजल्यमध्ये वाळू दिसून आली. तसेच भिंती तुटताना दिसल्या. त्यामुळे हा मजला खचण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच आत ऑक्सिजनचाही अभाव दिसून येत आहे. त्यामुळे ही बाब कुठल्यातरी दुर्घटनेचं कारण ठरू शकतं. त्यामुळे पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी बारवीची स्थिती पाहून सावधानपूर्वक काम करण्याची सूचना दिली आहे.