सावली पडल्यामुळे दलित मुलीस मारहाण
By Admin | Updated: June 17, 2015 02:30 IST2015-06-17T02:30:47+5:302015-06-17T02:30:47+5:30
स्पृश्य-अस्पृश्यतेचा भेदभाव अजूनही संपलेला नाही. एका ११ वर्षांच्या निष्पाप मुलीला या अस्पृश्यतेचे चटके सहन करावे

सावली पडल्यामुळे दलित मुलीस मारहाण
छतरपूर (मध्यप्रदेश) : स्पृश्य-अस्पृश्यतेचा भेदभाव अजूनही संपलेला नाही. एका ११ वर्षांच्या निष्पाप मुलीला या अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील एका गावात उघडकीस आली आहे. या दलित मुलीचा गुन्हा काय, तर तिची सावली एका उच्चवर्णीयावर पडली होती.
जिल्हा मुख्यालयापासून ३५ कि.मी. अंतरावरील गणेशपुरा गावात गेल्या १३ जून रोजी ही अमानवीय घटना घडली. लक्ष्मी नावाची ही अल्पवयीन दलित कन्या गावातीलच सार्वजनिक हापशीवर पाणी भरण्यास गेली होती. ती पाणी भरत असतानाच तेथून जात असलेल्या पुरण यादव नामक बाहुबलीवर तिची सावली पडली. ही वार्ता कळताच यादव कुटुंबातील स्त्रियांनी चिमुकल्या लक्ष्मीवर हल्लाबोल करून तिला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच त्यांचा निर्दयीपणा थांबला नाही. मुलगी पुन्हा हापशीवर दिसल्यास तिला जिवे मारण्याची धमकीही या बाहुबली कुटुंबातील महिलांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)