साध्वींच्या बचावासाठी भाजपाने खेळले दलित कार्ड
By Admin | Updated: December 5, 2014 13:55 IST2014-12-05T13:48:56+5:302014-12-05T13:55:53+5:30
केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती या दलित असल्यानेच विरोधक त्यांना लक्ष्य करत आहेत असे विधान केंद्रीय राज्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केले आहे.

साध्वींच्या बचावासाठी भाजपाने खेळले दलित कार्ड
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती या दलित असल्यानेच विरोधक त्यांना लक्ष्य करत आहेत असा आरोप केंद्रीय राज्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केले आहे. साध्वींच्या वादग्रस्त विधानावरुन संसदेतील गदारोळ थांबत नसल्यानेच भाजपाने आता दलित कार्ड खेळण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानाने सलग पाचव्या दिवशी संसदेत राज्यसभेत गदारोळ सुरु आहे. शुक्रवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, मल्लिकार्जून खडगे व अन्य काँग्रेस खासदार तोंडाला काळी पट्टी बांधून संसदेत आले होते. दुपारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादावर उत्तर दिले. साध्वींनी त्यांच्या विधानावर माफी मागितली असल्याने आता हा वाद इथेच थांबवावा अशी विनंती मोदींनी केली. तसेच राज्यसभेतील गोंधळाचा दाखला देत लोकसभा सदस्यांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले यासाठी त्यांनी सर्वांचे आभारही मानले. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खडगे यांनी साध्वींची पार्श्वभूमी महत्त्वाची नाही, त्या मंत्री आहेत व त्यांनी असे वादग्रस्त विधान करणे हे चुकीचे आहे असे निदर्शनास आणू दिले.
दुसरीकडे राज्यसभेत शुक्रवारीही विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घालत साध्वींच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्तार अब्बास नकवी आणि रामविलास पासवान यांनी या प्रकरणाला वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न केला. एक दलित महिला तुमच्यासमोर माफी मागतेय आणि त्यानंतरही तुम्ही तिला लक्ष्य करत आहात असे नकवींनी सांगितले. तर पासवान यांनीदेखील साध्वी दलित असून त्यांना लक्ष्य करणे योग्य नाही असे म्हटले आहे.