दिल्लीतील बुरारी येथे चार मजली इमारत कोसळल्यानंतर ३२ तासांनी चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. इमारत कोसळल्याने २१ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले, ज्यामध्ये २ अल्पवयीन मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी १६ जणांना वाचवण्यात आलं आहे.
बुरारी येथील ऑस्कर पब्लिक स्कूलजवळ ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २१ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस उपायुक्त (उत्तर) राजा बंथिया म्हणाले, बचाव कार्य अजूनही सुरू आहे आणि २९ जानेवारीपर्यंत ते सुरू राहण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांसोबतच, एनडीआरएफ आणि दिल्ली अग्निशमन सेवेच्या अनेक तुकड्या दिवसरात्र काम करत आहेत.
३२ तासांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आलेले चार जण एका कुटुंबातील छताच्या स्लॅबखाली सापडले. या जोडप्याव्यतिरिक्त, कुटुंबात दोन अल्पवयीन मुलं आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नव्याने बांधलेल्या इमारतीच्या छताचा स्लॅब स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर पडल्याने कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले.
सिलिंडरमुळेच कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली दबण्यापासून वाचले. ढिगाऱ्यातून वाचविण्यात आलेल्या चार जणांमध्ये राजेश (३०), गंगोत्री (२६), प्रिन्स (६) आणि ऋतिक (३) यांचा समावेश आहे. हे लोक जिथे होते तिथे छत एका सिलेंडरवर पडलं असं सांगितलं जात आहे.