सी.व्ही. राव महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
By Admin | Updated: August 27, 2014 04:40 IST2014-08-27T04:40:22+5:302014-08-27T04:40:22+5:30
शंकरनारायणन यांनी बदली झुगारून राजीनामा दिल्यानंतर तातडीने महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भाजपाचे ज्येष्ठ नेते चेन्नामनेनी विद्यासागर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे
सी.व्ही. राव महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
नवी दिल्ली : शंकरनारायणन यांनी बदली झुगारून राजीनामा दिल्यानंतर तातडीने महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भाजपाचे ज्येष्ठ नेते चेन्नामनेनी विद्यासागर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी राजस्थान, कर्नाटक आणि गोव्याच्या राज्यपालांच्या नावांचीही राष्ट्रपती भवनातून घोषणा करण्यात आली.
केंद्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अनेक राज्यपालांवर मुदतपूर्व पदत्यागासाठी दबाव आणला गेला. त्यानंतर गोव्याचे राज्यपाल बी.व्ही. वांच्छू यांनी राजीनामा दिला होता, तर कर्नाटकचे राज्यपाल एच.आर. भारद्वाज यांचा कार्यकाळ जुलैमध्ये आणि राजस्थानच्या राज्यपालपदावरील मार्गारेट अल्वांचा कार्यकाळ याच महिन्यात संपला. महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आपली मिझोराममध्ये झालेली बदली नाकारून रविवारी राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. शंकरनारायणन यांना राज्यपालपद सोडल्यानंतर त्यांचा अतिरिक्त पदभार गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर चार राज्यातील ताज्या नेमणुका झाल्या आहेत. राज्यपालपदी नव्याने नियुक्त झालेल्या चौघाही भाजपा नेत्यांची राजकीय कारकीर्द दीर्घ राहिली आहे. कल्याणसिंह उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत तर राव हे वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. वजुभाई वाला यांना गुजरात विधानसभेच्या अध्यक्षपदावरून थेट राज्यपालपदी नेण्यात आले आहे. मृदुला सिन्हा भाजपाच्या महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा असून हिंदी साहित्यिक म्हणूनही त्या परिचित आहेत.
मोदी सरकारने तीन महिन्यात सहा राज्यांच्या राज्यपालांची नव्याने नियुक्ती केली आहे. राम नाईक (उत्तर प्रदेश), केशरीनाथ त्रिपाठी (पश्चिम बंगाल), ओमप्रकाश कोहली (गुजरात), बलरामजी दास टंडन (छत्तीसगड), पद्मनाभ बालकृष्ण आचार्य (नागालँड) आणि कप्तानसिंग सोलंकी (हरियाणा).
मिझो विद्यार्थी संघटनेचा राज्यपाल बदलण्यास विरोध
संपुआ सरकारने नियुक्ती केलेल्या राज्यपालांना फेकण्यासाठी मोदी सरकारने मिझोरमला मैदान केले आहे, असा आरोप मिझो स्टुडेंट्स फेडरेशनने मंगळवारी केला. मिझोरमच्या जनतेशी अशाप्रकारची वागणूक अनुचित आहे. मिझोरममध्ये दोन महिन्यात चार राज्यपाल आले आहेत.