देशाची आयटी राजधानी बंगळुरुमध्ये संचारबंदी
By Admin | Updated: September 13, 2016 13:00 IST2016-09-13T13:00:46+5:302016-09-13T13:00:46+5:30
कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांना संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले आहे.

देशाची आयटी राजधानी बंगळुरुमध्ये संचारबंदी
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १२ - कावेरी पाणी वाटपाच्या प्रश्नावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांना संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले आहे. देशातील आयटी उद्योगाची राजधानी अशी ओळख असलेल्या बंगळुरुच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सोमवारी रात्री १०.३० नंतर बंगळुरुमध्ये कुठेही हिंसाचार झालेला नाही अशी माहिती बंगळुरुच्या पोलिस आयुक्तांनी दिली. बंगळुरुच्या राजगोपालनगरमध्ये पोलिसांना निदर्शकांवर गोळीबार करावा लागला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मालमत्तेची नासधूर, तोडफोड प्रकरणी आतापर्यंत ३०० जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, हिंसाचार करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बंगळुरुमध्ये अनेक ठिकाणी तामिळनाडू रजिस्ट्रेशनची वाहने पेटवून देण्यात आली. दुकाने, बसेस जाळण्यात आल्या.
कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्य सरकारने संपूर्ण बंगळुरुमध्ये १५ हजार पोलिस तैनात केले आहेत. यामध्ये दंगलनियंत्रण पथकाचाही समावेश आहे. ईदची सुट्टी असल्याने रस्ते ओस पडले असून, शाळा महाविद्यालये आणि कार्यालये बंद आहेत.