सहारनपूरमध्ये संचारबंदी जारी; ३८ जण अटकेत
By Admin | Updated: July 28, 2014 02:51 IST2014-07-28T02:51:07+5:302014-07-28T02:51:07+5:30
उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये जमिनीच्या वादातून उसळलेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत ३८ लोकांना अटक करण्यात आली आहे़

सहारनपूरमध्ये संचारबंदी जारी; ३८ जण अटकेत
सहारनपूर/लखनौ : उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये जमिनीच्या वादातून उसळलेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत ३८ लोकांना अटक करण्यात आली आहे़ हिंसाचारग्रस्त भागांतील तणावपूर्ण शांतता बघता, रविवारी दुसऱ्या दिवशीही संचारबंदी आणि दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश लागू आहेत़ उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा-व्यवस्था) मुकुल गोयल यांनी सांगितले की, शनिवारपासून कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही़ स्थिती लवकरात लवकर सामान्य व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ सहारनपूरच्या जिल्हाधिकारी संध्या तिवारी यांनी आज हिंसाचारप्रभावित भागांचा दौरा केला़ स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे त्यांनी सांगितले़
कुतूबशेर भागातील एका वादग्रस्त जमिनीवरून काल सहारनपूरमध्ये दोन समाजात हिंसाचार उसळला होता़ बघता बघता या वादाचे लोण येथील अनेक भागांत पसरले होते़ यात ३ ठार, तर २0 जण जखमी झाले होते़. या जमिनीच्या वादाबाबत विचारले असता, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला़ (वृत्तसंस्था)