CSDS Sanjay Kumar: सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजचे संचालक आणि प्रसिद्ध राजकीय विश्लेषक संजय कुमार या सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. संजय कुमार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या फौजदारी कारवाईला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. मतदार यादीशी संबंधित चुकीचा डेटा पोस्ट केल्याप्रकरणी संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने गुन्ह्याला स्थगिती दिली आहे. संजय कुमार यांच्या पोस्टमुळे मतचोरीबाबत विरोधकांच्या दाव्याला बळ मिळाले होते. मात्र त्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलिट करुन माफी मागितली होती.
राजकीय विश्लेषक संजय कुमार यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम दिलासा दिला आहे. मतदार यादीशी संबंधित चुकीची माहिती पोस्ट केल्याबद्दल नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये कोर्टाने कारवाईला स्थगिती दिली. संजय कुमार यांना ज्या दोन एफआयआरमध्ये दिलासा मिळाला आहे त्यामध्ये नाशिक आणि नागपूरचा समावेश आहे. मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महाराष्ट्र सरकार आणि तक्रारदारांना याप्रकरणी नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांबद्दल दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा संजय कुमार यांच्यावर आरोप आहे.
सीएसडीएसचे संजय कुमार यांनी २०२४ चा लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेचे १२६ देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदारांबाबत चुकीची माहिती पोस्ट केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असं नाशिकच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाने म्हटलं होतं. नागपूरमधील रामटेकच्या तहसीलदारांनीही त्यांच्याविरोधात तक्रार देत रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याआधी संजय कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या जागांवर मते कमी झाल्याचे सांगत आकडेवारी दिली होती. मात्र त्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलिट करत माफी मागितली. यानंतर लगेचच संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
संजय कुमार यांची ती चूक होती. त्यांनी ते डिलीट केले आणि सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे, असं त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात सांगितले. त्यानंतर सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने नोटीस जारी करा आणि गुन्ह्याला स्थगिती द्या असे आदेश दिले.