सांप्रदायिक हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेत वाक्युद्ध

By Admin | Updated: March 18, 2015 00:11 IST2015-03-18T00:11:38+5:302015-03-18T00:11:38+5:30

लोकसभेत मंगळवारी सांप्रदायिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांमध्ये चांगलेच वाक्युद्ध रंगले.

Criticism in Parliament on the issue of communal violence | सांप्रदायिक हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेत वाक्युद्ध

सांप्रदायिक हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेत वाक्युद्ध

नवी दिल्ली : लोकसभेत मंगळवारी सांप्रदायिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांमध्ये चांगलेच वाक्युद्ध रंगले. पंतप्रधानांनी अल्पसंख्याकांना ग्वाही दिल्यानंतरही देशात धार्मिक असहिष्णुतेचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप काँग्रेस व तृणमूल काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर केला. काँग्रेस सदस्यांनी या मुद्यावर सभात्यागही केला.
संसदीय कामकाजमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी मात्र विरोधकांचा आरोप फेटाळून लावताना काँग्रेसवर उलटवार करीत धर्माचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावर राज्यांना कारवाई करूद्या. संसदेत यावरून आरोप-प्रत्यारोप करू नका, असे आवाहन त्यांनी सदस्यांना केले. ते म्हणाले की, धर्माच्या राजकारणावर आमचा विश्वास नाही. ‘सर्वांची साथ आणि सर्वांचा विकास’ हा सरकारचा नारा आहे.
हरियाणाच्या हिस्सारमध्ये एका निर्माणाधीन चर्चची झालेली तोडफोड, पश्चिम बंगालमध्ये ननवर सामूहिक बलात्काराची घटना आणि भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे आसाममधील वादग्रस्त वक्यव्य आदी मुद्दे काँग्रेसने सभागृहात उचलून धरले आणि केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनापुुढे येऊन सरकारकडून सविस्तर निवेदनाची मागणी केली. पंतप्रधानांच्या आश्वासनानंतरही देशात एवढे कलुषित वातावरण का तयार होत आहे? असा त्यांचा सवाल होता. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाचा मोर्चा सांभाळला. तत्पूर्वी गौरव गोगई यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.(लोकमत न्यूज नेटवर्क)

स्वामींच्या वक्तव्यावरून गदारोळ
राज्यसभेत काँग्रेस सदस्यांनी सुब्रमण्यम स्वामी यांनी मशिदींबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून गदारोळ केल्यामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटे तहकूब करावे लागले.
अमर साबळेंचा शपथविधी
काँग्रेसचे नेते राज बब्बर, भाजपचे अमर शंकर साबळे आणि तृणमूल काँग्रेसच्या डोली सेन यांनी मंगळवारी राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली.
मुख्य आरोपी अटकेत
एका बांधकाम सुरू असलेल्या चर्चच्या तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपीला हरियाणा पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)




अनिल गोदारा असे आरोपीचे नाव आहे. हिस्सार येथून त्याला अटक करण्यात आली. प्रकरणाचा तपास सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे हिस्सारचे पोलीस अधीक्षक सौरभ सिंह यांनी सांगितले.
हिस्सारनजीकच्या कैमरी गावात रविवारी संबंधित चर्चची एका समूहाने तोडफोड केली होती. यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. (वृत्तसंस्था)

पुढील वर्षी चीनला मागे टाकत विकासदर ८ टक्क्यांवर नेण्याची ऐतिहासिक संधी असून विरोधकांनी ‘अडेलतट्टू’ची भूमिका बजावू नये, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी लोकसभेत केले. संसदेत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणात्मक विधेयके अडकून असल्याकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केला.
लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सरकार श्रीमंतधार्जिणे असल्याचा आरोप फेटाळून लावला. कॉर्पोरेट कर ३० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणल्याच्या आधारे विरोधकांनी हा आरोप चालविला आहे; मात्र ही कल्पना आम्ही माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आणलेल्या प्रत्यक्ष करसंहितेतून घेतली आहे, असे जेटली म्हणाले.


संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष
आपल्याला ऐतिहासिक संधी मिळाली आहे. जागतिक स्थिती देशासाठी अनुकूल आहे. संपूर्ण जग भारताकडे बघत असून या ऐतिहासिक संधींचे सोने करीत आपल्याला खऱ्या अर्थाने समोर जाण्याचा काळ आला आहे. दक्षिण आफ्रिका, जपान आव्हानांचा सामना करीत असतानाच युरोप मंदीच्या सावटात सापडले आहे. अशा स्थितीत आपण चीनला मागे टाकू असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणणे आहे. अर्थव्यवस्थेच्या पुढील टप्प्यात जाण्याच्या मार्गात अडसर बनू नका, असा माझा विरोधकांना आग्रह आहे, असेही जेटली म्हणाले.

काळ्या पैशासंबंधी
विधेयक याच अधिवेशनात
काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी विधेयक याच अधिवेशनात आणले जाणार असल्याची ग्वाही जेटलींनी दिली. विदेशात असलेली संपत्ती दडवून ठेवणाऱ्यांना ३०० टक्क्यांपर्यंत दंड आणि १० वर्षांपर्र्यत शिक्षा ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे. सध्या ७७ जणांवर खटला भरण्यात आला असून येत्या तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

‘भ्रष्टाचार’ शब्दकोशातून बाद
अर्थसंकल्पावरील चर्चेत १६२ सदस्य सहभागी झाले; मात्र कुणीही ‘भ्रष्टाचार’ हा शब्दही उच्चारला नाही. याचा अर्थ गेल्या १० महिन्यांत देशाच्या शब्दकोशातून हा शब्द मिटवला गेला आहे, हेच दिसून येते, असे सांगत जेटलींनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला.


निषेध... ननवरील बलात्कारप्रकरणी अद्याप आरोपीस अटक न झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी पश्चिम बंगालच्या नादिया येथे निषेध मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.



मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी नादियाकडे जात असताना लोकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते. लोकांनी रस्त्यातच बॅनर्जी यांचा ताफा अडवला होता.

 

Web Title: Criticism in Parliament on the issue of communal violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.