राजस्थानमधील अजमेर येथील ख्रिश्चनगंज पोलिसांच्या हद्दीत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पोटच्या तीन वर्षांच्या मुलीला तलावात फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सीओ रुद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ४ वाजताच्या सुमारास बजरंग गड चौकात पोलिसांनी एक पुरुष आणि एक महिला संशयितपणे थांबलेले दिसले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता महिलेने सांगितले की, तिची तीन वर्षांची मुलगी बेपत्ता असून ते दोघेही तिचा शोध घेत आहेत. त्यानंतर दोघांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सुरुवात केली.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
तपासणीदरम्यान, संबंधित महिला मंगळवारी रात्री १० ते पहाटे १:३० वाजेपर्यंत तिच्या मुलीसोबत दिसली. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर वेगळाच संशय आला. त्यांनी संबंधित महिलेची कसून चौकशी केली असता तिने मुलीला तलावात ढकलून दिल्याची कबुली दिली. याप्रकरणी महिलेला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मुलीपासून सुटका मिळवण्यासाठी क्रूर कृती
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली उर्फ प्रिया सिंग, असे आरोपी महिलेचे नाव असून ती उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील साकुलपुरा येथील रहिवाशी आहे. अंजलीने तिच्या पतीला सोडून दिले होते आणि ती आपल्या लिव्ह-इन पार्टनर अक्लेश गुप्तासोबत दातानगरमध्ये राहत होती. मुलीपासून सुटका मिळवण्यासाठी तिने ही क्रूर कृती केली.