Tirumala Tirupati Devasthanams: काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती मंदिर प्रसादामध्ये मिळणाऱ्या लाडूमुळे वादाच्या भोवऱ्यात आढळलं होतं. प्रसादामध्ये दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये चरबी आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता तिरुपती येथील गोशाळेबाबत वायएसआरसीपी नेत्याने मोठा दावा केला आहे. तिरुपती येथील गोशाळेत गायींचा मृत्यू होत असून तीन महिन्यांमध्ये १०० गायी मृत्यूमुखी पडल्याचा दावा वायएसआरसीपीच्या नेत्याने केला आहे. मात्र तिरुपती संस्थानने आणि आंध्र प्रदेश सरकारने हा दावा फेटाळून लावत ही बातमी खोटी असल्याचे म्हटलं आहे.
तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या गोशाळेत मोठ्या प्रमाणाता गायी मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात आला आहे. टीटीडीचे माजी अध्यक्ष आणि वायएसआरसीपी नेते भूमना करुणाकर रेड्डी यांनी आंध्र प्रदेश सरकारवर या प्रकरणी गंभीर आरोप केला. लोकांना खरी गोष्ट कळावी आणि तिरुमलाचे पावित्र्य राखले जावे यासाठी भूमना करुणाकर रेड्डी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
"गेल्या तीन महिन्यांत १०० हून अधिक गायींचा योग्य काळजी न घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या आणखी वाढू शकते, कारण माझ्यापर्यंत एवढीच माहिती समोर आली आहे. हे लोक आमचे नेते वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर खोटे आरोप करण्यात आणि त्यांची चांगली कामे पुसून टाकण्याचा प्रयत्नात आहेत," असे भूमना करुणाकर रेड्डी म्हणाले.
"आम्हाला इतक्या गायींच्या मृत्यूची आणि गोशाळेतील खराब व्यवस्थेची चौकशी करुन हवी आहे. या गोशाळेची देखभाल जिल्हा वनाधिकारी करतात, ज्यांना पशुवैद्यकीय शास्त्राचे कोणतेही ज्ञान नाही. भाजप-टीडीपीचे सरकार आणि टीटीडी प्रशासकीय मंडळाचा हा निष्काळजीपणा आहे. इतक्या गायींचे अचानक मृत्यू हे जगन मोहन रेड्डी यांच्यावर निराधार आरोप करणाऱ्या सध्याच्या सरकारविरुद्ध एक दैवी संकेत आहे," असंही विधान रेड्डी यांनी केले.
रेल्वे ट्रॅकवर एक गर्भवती गाय मृतावस्थेत आढळली होती आणि अधिकाऱ्यांनी तिचे कान कापले, ज्यावर टीटीडीचा टॅग होता, असाही दावा भूमना करुणाकर रेड्डी यांनी केला. टीटीडी आणि गौशाळेचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न वायएस राजशेखर रेड्डी आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांनी केला होता असेही रेड्डी यांनी सांगितले.
या आरोपांना उत्तर म्हणून, तिरुमला तिरुपती देवस्थानमने शुक्रवारी एक अधिकृत निवेदन जारी केले. यामध्ये भूमना रेड्डी यांनी केलेल्या दाव्यांचे खंडन करण्यात आले आहे. या खोट्या बातम्या असून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असे यात म्हटलं आहे. "टीटीडी गोशाळेत गायींचा मृत्यू झाल्याचा सोशल मीडियावर पसरवलेला दावा खरा नाही. मृत गायींचे फोटो टीटीडी गोशाळेशी संबंधित नाहीत. मृत्युमुखी पडलेल्या गायींचे फोटो दाखवून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याचा टीटीडी निषेध करते," असे निवेदनामध्ये म्हटलं आहे.