हिंदूच्या भावना दुखावत असल्यास गोहत्या थांबली पाहिजे - फारूख अब्दुल्ला
By Admin | Updated: November 18, 2015 21:01 IST2015-11-18T18:37:00+5:302015-11-18T21:01:40+5:30
गोहत्या केल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असतील तर गोहत्या करणं थांबलं पाहिजे असे मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.

हिंदूच्या भावना दुखावत असल्यास गोहत्या थांबली पाहिजे - फारूख अब्दुल्ला
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १८ - गोहत्या केल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असतील तर गोहत्या करणं थांबलं पाहिजे असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे. देशासह काश्मीरमध्ये गोहत्या व बीफबंदीवरून वाद चिघळलेला असतानाच फारूख अब्दुल्ला यांनी प्रथमच या विषयावरील आपले मौन सोडले असून त्यांचे हे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.
विविधतेत एकता ही आपल्या देशाची ओळख असून सर्वांचा त्यावर विश्वास आहे. त्यामुळे गोहत्या थांबवली गेली पाहिजे असे जर हिंदू समाजातील नागरिकांना वाटत असेल तर त्यांच्या भावनांचा आदर राखला पाहिजे आणि गोहत्या थांबली पाहिजे, असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले.
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने राज्यात बीफबंदी सक्तीने लागू करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. फारूख अब्दुल्ला यांचे पुत्र उमर यांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला होता. मात्र आता त्यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांनी मात्र विरोधी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.