अयोध्येवर न्यायालयच निर्णय घेईल
By Admin | Updated: June 7, 2015 22:58 IST2015-06-07T22:58:59+5:302015-06-07T22:58:59+5:30
अयोध्या मुद्दा कायदा आणून सोडविला जाऊ शकत नाही आणि या मुद्यावर केवळ न्यायालयच निर्णय घेईल, असे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने स्पष्ट केले आहे.

अयोध्येवर न्यायालयच निर्णय घेईल
नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी विहिंप आणि काही भाजप नेत्यांनी केलेली असतानाच, अयोध्या मुद्दा कायदा आणून सोडविला जाऊ शकत नाही आणि या मुद्यावर केवळ न्यायालयच निर्णय घेईल, असे अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने स्पष्ट केले आहे.
‘राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा करण्यात आला पाहिजे, असे सांगितले जात आहे; परंतु हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्यामुळे संसदेत कायदा आणणे शक्य होणार नाही. कायद्याच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार नाही तर न्यायालयातूनच त्याच्यावर तोडगा काढता येईल,’ असे बोर्डचे प्रवक्ते अब्दुल रहीम कुरेशी यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा न करता राम मंदिर बांधण्याच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार विनय कटियार यांनी केलेली होती.
कटियार यांच्यावर टीका करताना कुरेशी म्हणाले, केंद्रात सरकार स्थापन करतेवेळी बाजूला सारण्यात आल्यामुळे कटियार हे आता स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारची विधाने करीत आहेत. कटियार यांना सरकारमध्ये एखादे पद हवे आहे, असे दिसते; परंतु आम्ही अशा प्रकारच्या वक्तव्यांना फारसे महत्त्व देत नाही.
मोदी सरकारला राज्यसभेत बहुमत नसल्याकारणाने अयोध्या मुद्यावर कायदा करणे शक्य होणार नाही, या केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या विधानाकडे कुरेशी यांनी लक्ष वेधले. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर चर्चा करण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. चर्चा कुणाशी? जे ऐकायला तयारच नाहीत त्यांच्याशी आम्ही चर्चा कशी काय करू शकतो, असा सवाल कुरेशी यांनी केला.
----------------
भाजपच्या राजवटीतच राम मंदिर बांधणार -साक्षी महाराज
उन्नाव : आणखी चार वर्षे कायम राहणार असलेल्या केंद्रातील भाजप सरकारच्या राजवटीतच अयोध्येत राम मंदिर बांधण्यात येईल, असे जाहीर करून वादग्रस्त भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एका नव्या वादाला जन्म दिला. साक्षी महाराज यांच्या या विधानावर काँग्रेससह अन्य पक्षांनी जोरदार टीका केली आहे.
‘राम मंदिर भाजपच्या राजवटीत बांधणार नाही, तर मग काँग्रेसच्या राजवटीत बांधणार का? की मुलायमसिंग किंवा मायावती राममंदिर बांधणार आहेत का? राममंदिर भाजपच्याच राजवटीत बांधण्यात येईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. ते आज बांधले नाही तर उद्या किंवा परवा तरी बांधले जाईल. आम्हाला सत्तेत केवळ एक वर्ष पूर्ण झाले आहे. आणखी चार वर्षे बाकी आहेत,’ असे साक्षी महाराज म्हणाले. उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते. (वृत्तसंस्था)