अमित शहा यांना आरोपी करण्यास कोर्टाचा नकार
By Admin | Updated: May 16, 2014 05:04 IST2014-05-16T05:04:23+5:302014-05-16T05:04:23+5:30
इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात भाजपाचे सरचिटणीस अमित शहा व गुजरातचे माजी पोलीस महासंचालक के. आर. कौशिक यांनाही आरोपी करावे यासाठी करण्यात आलेला अर्ज येथील विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी फेटाळला.

अमित शहा यांना आरोपी करण्यास कोर्टाचा नकार
अहमदाबाद: इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात भाजपाचे सरचिटणीस अमित शहा व गुजरातचे माजी पोलीस महासंचालक के. आर. कौशिक यांनाही आरोपी करावे यासाठी करण्यात आलेला अर्ज येथील विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. या बनावट चकमकीत इशरत जहाँसोबत ठार झालेल्या प्रणेश ऊर्फ जावेद शेखचे वडील गोपीनाथ पिल्लई यांनी हा अर्ज केला होता. त्यावर शहा व कौशिक यांच्याविरुद्ध आरोपी करण्याइतपत पुरावे नाहीत, अशी सीसीबीआयने दिलेली ‘क्लीन चिट’ विचारात घेऊन विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश गिती गोपी यांनी हा अर्ज फेटाळला. न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणी सीबीआयने सादर केलेले पुरवणी आरोपपत्र अजूनही दंडाधिकारी न्यायालयातून वर्ग केले गेलेले नाही. त्यामुळे ते आरोपपत्र या न्यायालयापुढे आल्याखेरीज हे प्रकरण समग्रपणे विचारात घेता येणार नाही. शिवाय साक्षीदारांनी तपासात दिलेले जबाब आत्ताच्या टप्प्याला पुरावे म्हणून विचारात घेता येणार नाहीत. त्यांच्यावर खटला सुरु होईल तेव्हाच विचार केला जाऊ शकेल. शिवाय सीबीआयने तपासात घेतलेल्या जाब-जबाबांच्या ग्राह्यतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे तेथे निकाल होईपर्यंत हे जबाब येथे विचारात घेता येणार नाहीत, असेही न्यायालयाने नमूद केले. सीबीआयने तपासात मिळविलेला कॉल रेकॉर्ड डेटा व काही साक्षीदारांच्या जबाबांवरून शहा व कौशिक यांचा सहभाग दिसून येतो, असा पिल्लई यांचा दावा होता. (वृत्तसंस्था)