इसिसमध्ये सामील होण्यास गेलेली तरूणी परतली
By Admin | Updated: February 2, 2015 08:55 IST2015-02-02T01:31:08+5:302015-02-02T08:55:29+5:30
तिने बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केले. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला.

इसिसमध्ये सामील होण्यास गेलेली तरूणी परतली
हैदराबाद : तिने बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केले. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रहित करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.
१९ वर्षांची ही मुलगी दोन महिन्यांपूर्वीच आई-वडिलांसोबत हैदराबादला परतली असून गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. प्राथमिक चौकशीनुसार दहा वर्षांपूर्वी ती कुटुंबियांसोबत हैदराबादहून दोहा (कतार) येथे आली. ती कतारलाच राहायची. शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिला इसिसची भुरळ घातली. इराक आणि सिरियावर कब्जा मिळविणाऱ्या इसिस या संघटनेत सामील होण्याच्या इराद्याने दोघींनी तुर्की गाठली. मन पालटल्याने तुर्कीहून ती कतारला आई-वडिलांकडे परतली. तेथून कुटुंबियांसोबत ती हैदराबादला परतली.
हैदराबादेत परतल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. तिला भरीस घालणारी तिची मैत्रीण तुर्कीची नागरिक असून सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून दोघींची ओळख झाली. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जुळणारे मैत्रीबंध चांगलेच असतात असे नाही. तेव्हा सोशल नेटसफर करणाऱ्यांनी सावधानता बाळगणे जरूरी आहे. अन्यथा वाईट संगतीने आयुष्याची वाट लागायची?