समुपदेशनातून कौशल्य विकास नागपुरात होणार केंद्र: रोजगाराबाबत मार्गदर्शन
By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:43+5:302015-02-21T00:50:43+5:30
नागपूर: युवकांची शैक्षणिक पात्रता, बौद्धिक क्षमता,त्याचा कल आणि बाजारात उपलब्ध असलेल्या रोजगाराची संधी लक्षात घेऊन त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यासाठी स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

समुपदेशनातून कौशल्य विकास नागपुरात होणार केंद्र: रोजगाराबाबत मार्गदर्शन
न गपूर: युवकांची शैक्षणिक पात्रता, बौद्धिक क्षमता,त्याचा कल आणि बाजारात उपलब्ध असलेल्या रोजगाराची संधी लक्षात घेऊन त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यासाठी स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्य सरकारने रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकासावर अधिक भर दिला असून राज्याचे रोजगार व स्वयंरोजगार खात्याकडेच कौशल्य विकासाचे काम सोपवण्यात आले आहे. या निमित्ताने प्रथमच खात्याला पूर्णवेळ सचिव मिळाले आहेत. कौशल्य विकासाकरिता युवकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यात नागपूरचाही समावेश आहे. तरुणांकडे पदवी असली तरी कौशल्याचा अभाव असल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीचा त्यांना फायदा होत नाही. एकीकडे रोजगार असूनही त्यासाठी पात्र मनुष्याचा अभाव तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असे परस्पर विरोधी चित्र आहे. ते बदलण्यासाठी कौशल्य विकासाला महत्त्वाचे स्थान आहे. युवकांची शैक्षणिक पात्रता आणि बाजारात उपलब्ध असलेली रोजगाराची संधी याची सांगड घालून त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यासाठी पुढच्या काळात भर देण्यात येणार आहे. समुपदेशन केंद्रातून याच बाबीचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या केंद्रासाठी यासाठी आवश्यक त्या साहित्याच्या खरेदीलाही मंजुरी मिळाली आहे. दरम्यान स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केलेल्या युवकांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा मोठ्या प्रमाणात लाभ युवक व युवती घेत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)